चालकाला एकट्यालाच द्यावी लागेल वाहन चाचणी

अनिल जमधडे
शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016

औरंगाबाद - वाहन चालविण्याचा परवाना काढत असाल तर आता ‘चिटिंग’ चालणार नाही. वाहन चाचणी ट्रॅकवर तुमच्या वाहनात, चाचणी देताना तुमच्या शेजारी आता वाहन निरीक्षक बसून तुम्ही खरेच वाहन चालवू शकता का याची चाचपणी करणार आहे. अगदी सफाईदारपणे वाहन चालविणाऱ्यालाच परवाना देण्याची भूमिका परिवहन विभागाने घेतली आहे. 

औरंगाबाद - वाहन चालविण्याचा परवाना काढत असाल तर आता ‘चिटिंग’ चालणार नाही. वाहन चाचणी ट्रॅकवर तुमच्या वाहनात, चाचणी देताना तुमच्या शेजारी आता वाहन निरीक्षक बसून तुम्ही खरेच वाहन चालवू शकता का याची चाचपणी करणार आहे. अगदी सफाईदारपणे वाहन चालविणाऱ्यालाच परवाना देण्याची भूमिका परिवहन विभागाने घेतली आहे. 

परिवहन कार्यालयात आता अर्धवट प्रशिक्षण घेऊन येणाऱ्यांना वाहन परवाना सहजपणे काढणे कठीण केले गेले आहे. अर्थात तुम्ही सराईतपणे वाहन चालवत असाल तर अडचण येणार नाही. शहरामध्ये तब्बल ९० मोटार ड्रायव्हिंग स्कूल आहेत. जवळपास बहुतांश स्कूलमध्ये एक महिन्याचा कालावधी झाल्यानंतर स्कूलच्या वतीने वाहन परवान्याच्या कागदपत्रांची पूर्तता केली जाते. आतापर्यंत वाहन परवाना काढण्यासाठीची चाचणी देताना, ड्रायव्हिंग स्कूलचा चालक शेजारी बसून परवाना काढण्यासाठी चाचणी देणाऱ्या चालकाला वाहन चालवण्याची मदत करत होता. ड्रायव्हिंग स्कूलच्या वाहनाला चालकाच्या शेजारी बसणाऱ्यालाही ऑपरेट करता यावेत अशा पद्धतीने क्‍लच आणि ब्रेकची व्यवस्था असल्याने वाहन शिकणाऱ्याच्या हातात स्टेअरिंग असले तरीही क्‍लच आणि ब्रेक हे शिकवणाऱ्याच्या म्हणजे शेजारी बसणाऱ्याच्या हातात असल्याने वाहन चाचणी ट्रॅकवर वाहन चालविताना चाचणी देणाऱ्याला पूर्ण मदत करत असल्याने सहजपणे वाहन चालविण्याचा बनाव करून सहजपणे परवाना मिळत होता. त्यामुळे वाहन न चालवता येणाऱ्या अनेकांकडे परिवहन विभागाचा वाहन चालविण्याचा परवाना आहे. ही पद्धत मोडीत काढण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांच्या मार्गदर्शनानुसार सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नखाते यांनी वाहन चाचणीची पूर्वीची पद्धत मोडीत काढली. आता वाहन चाचणी देणाऱ्याच्या बाजूला मोटार ड्रायव्हिंग स्कूलचा व्यक्ती बसणार नाही. तर त्याऐवजी परिवहन निरीक्षक स्वत: बसूनच संबंधित वाहन चालविणारा व्यक्ती चाचणी कशा पद्धतीने देतो याची शहानिशा करणार आहे. 

चाचणीवर परिणाम
परिवहन कार्यालयात पूर्वी दररोज साधारण शंभर ते सव्वाशे व्यक्ती वाहन परवाना काढण्यासाठी चाचणी देत होते. मात्र गेल्या चार दिवसांपासून वाहन चाचणीची पद्धत बदलल्याने वाहन परवाना काढणाऱ्यांची गर्दीच संपली आहे. आता दररोज सत्तर ते ऐंशी जण परवान्यासाठी चाचणी देत आहेत, त्यातही पंधरा ते वीस जण नापास होत आहेत. नापास झालेल्यांना पुन्हा नव्याने सराव करून चाचणीसाठी येण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. परिपूर्ण आणि सफाईदारपणे वाहन चालविता येत असेल तरच परवाना देण्याचे धोरण परिवहन विभागाने घेतल्याने येत्या काळात स्मार्ट चालक तयार होतील अशी अपेक्षा आहे.

अपघातामध्ये जगभरात भारतात सर्वाधिक अपघात होतात. रस्त्यावर वाहन चालकाच्या चुकीने अपघात झाला तर ती परिवहन विभागाची जबाबदारी असल्याचे आम्ही समजतो. म्हणूनच वाहन चालकाने परिपूर्ण प्रशिक्षण घेतल्याशिवाय, त्याला परवाना देऊ नये ही भूमिका आहे. यासाठी ड्रायव्हिंग स्कूलचालकांची बैठक घेऊन त्यांना गांभीर्य लक्षात आणून दिले जाणार आहे. परवाना देण्याचे नियम कठोर असतील तर अधिक सक्षम चालक तयार होतील आणि अपघाताचे प्रमाणही कमी होण्यास मदत होईल. 
- श्रीकृष्ण नकाते (सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी)

Web Title: vehicle test by driver