चोरीची अक्कल व्यवहारात गहाण!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जुलै 2019

घरातल्या नंबर प्लेटने केली पोलखोल
पोलिस ज्यावेळी अशोकच्या घरी पोचले, त्यावेळी त्याच्या घरात व आसपास दुचाकीच नव्हत्या. खबऱ्याने कमकुवत खबर दिली असावी, असे वाटत असतानाच अशोकच्या घरात दुचाकीच्या विविध नंबर प्लेट्‌स आढळल्या. यावरून पोलिसांनी खबर पक्की समजून सुतावरून स्वर्ग गाठला आणि १९ दुचाकी जप्त केल्या.

औरंगाबाद - तो स्वयंघोषित महाराज. अमुक अमुक देवाचा भक्त. अंगात येते तेव्हा लोकांना बरेही करतो. अशा गुजगोष्टी सांगत चोरीही करतो. एक-दोन नव्हे, चक्क १९ दुचाकी आठ महिन्यांत त्याने साथीदारासोबत चोरल्या; पण व्यवहाराची अक्कल नसल्याने ग्रामीण भागात पन्नास हजारांची दुचाकी केवळ एक ते दोन हजारांना तो विकत होता. एवढ्या स्वस्तात दुचाकी विकत असल्याने त्याच्यावर संशय बळावला आणि तो पोलिसांच्या बेडीत अडकला. 

अशोक तामचीकर (वय २८) असे या संशयिताचे नाव. नारेगावातच एका खोलीत एकटाच राहतो. आठ महिन्यांपूर्वी चोरीच्या ‘उद्योगात’ त्याने प्रवेश केला. प्रदीप जाधव यालाही सोबतीला घेतले आणि एक-दोन नव्हे, १९ दुचाकी दोघांनी मिळून चोरल्याची बाब उकलली. तो स्वत:ला चिखली भागातील एका देवाचा भक्त म्हणवून घेतो. बऱ्याच दिवसांपासून तो स्वत:ला महाराजही म्हणवून घेत होता. अंगात आल्यावर नंतर इलाज करतो, असा दावा त्याने केल्याचे पोलिसांनी सांगितले. साथीदाराला सोबत घेऊन त्याने शहरातील दहा, तर इतर जिल्ह्यांतील नऊ अशा एकूण १९ दुचाकी चोरी केल्या. विशेषत: या दुचाकी तो रात्रीच चोरी करायचा. त्याने चोरलेल्या दुचाकींपैकी सोळा दुचाकी एकाच कंपनीच्या होत्या. खबऱ्याच्या माहितीवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता दुचाकीचोरीची त्याने कबुली दिली. त्याला व साथीदाराला अटक करण्यात आली. सोबतच त्यांनी चोरलेल्या दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्या. ही कारवाई पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक आयुक्त गुणाजी सावंत, पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्या सूचनेनुसार पोलिस उपनिरीक्षक ताहेर पटेल, सुरेश जारवाल, शाहेद शेख, गणेश राजपूत, दीपक शिंदे, नितेश सुंदर्डे, भोटकर, मुनीर पठाण, कोलते, घुगरे यांनी केली. 

जप्त केलेल्या दुचाकींचे इंजिन क्रमांक
-०४b२७२४८०४ 
०२b१८m०४०७३
०२k१८०७५८०
०१b१८m०२२५०
०l१५m१५०१८
ha११edb९m४२८७२
ha१०endhd३१०५२
ha११ejg९०३१७७९
ha१०eldhj५१२१
०७m२२e१२४६९
ha११ejfa२९०००
jc३६e-७-३८०२६५१
ha११ea९nd१६४१४
०७a१५m०४४९२
०७j२२e४४७२४
ha११ea८९k०८९३०
ha११ecb९c२०६७१
ha११efd९g४३६१८
dkzcdc६४००३

दुर्गम भागात विक्री
पन्नास हजारांवर किमतीच्या महागड्या दुचाकी केवळ एक ते दोन हजारांत दुर्गम, डोंगराळ भागात त्याने विकल्या. विशेषत: पोलिसांना समजू नये म्हणून जालन्यातील चोरीच्या औरंगाबाद जिल्ह्यात व औरंगाबादेतील जालना जिल्ह्यात दुचाकी त्याने विकल्या. या पैशांतून व्यसन व उदरनिर्वाह त्याने केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vehicle Theft Criminal Arrested Crime