मराठवाड्यातील कित्येक गावांत आज संचारबंदी का? : पहा PHOTOS

राजेंद्रकुमार जाधव
बुधवार, 25 डिसेंबर 2019

दुपारनंतर जिल्ह्यातील सर्वच शहरामध्ये अघोषित संचारबंदीसारखी परिस्थिती असते. व्यापारीही सकाळी अकरापासून दुकाने बंद करून शेताकडे जातात. ग्रामीण भाग असो की शहरी, यादिवशी बहुतांश नागरिक शेताकडे जात असल्यामुळे शिवारे गर्दीने फुललेली असतात तर शहर व गावे ओस पडलेली असतात. दुपारपासून सायंकाळपर्यंत ही परिस्थिती असते.

उस्मानाबाद : लातूर, उस्मानाबादसह बिदर (कर्नाटक) जिल्ह्यात बुधवारी (ता. २५) सालाबादप्रमाणे वेळा अमावस्या पारंपरिक उत्साहात साजरी होत आहे. 
वनभोजन, झोके आणि पतंगबाजीसाठी सारी गावेच्या गावे रानात जातील आणि गावात जणू अघोषित संचारबंदीच लागू होईल. 

लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि बिदर (कर्नाटक) या जिल्ह्यांतील सीमावर्ती भागात मार्गशीर्ष महिन्यातील दर्श अमावास्येला वेळा अमावास्या म्हटले जाते. रब्बी हंगामात आलेल्या जोमदार पिकांच्या आनंदामुळे शेतात नवचैतन्य असते. शेतकऱ्यांमध्ये बहरातील पिकांना पाहून आनंदाचे भरते येते. शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला वेळअमावस्या सण बुधवारी (ता. 25) आहे. या सणाची शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांनी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जय्यत तयारी केली आहे. या सणानिमित्त काळ्या आईचे ऋण फेडण्यासाठी शेतात जाऊन शेतकरी कुटुंबियाकडून मनोभावे पूजा केली जाते. परंपरेनुसार शेतकरी हा सण दरवर्षी साजरा करतात. 

Image may contain: 6 people, people standing, wedding, child and flower
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख दरवर्षी वेळा अमावस्येला न चुकता बाभुळगावी येऊन पांडवांची पूजा करून गावकऱ्यांसह वनभोजनाचा आनंद लुटत.

पाच पांडव, पेंढ्यांची कोप

जिच्यावर आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो, त्या काळ्या आईची या दिवशी शेतकरी कुटुंबिय मनोभावे पूजा करतात. शेतामध्ये कडबा किंवा गवताच्या पेंढ्याची कोप तयार केली जाते. त्यामध्ये पाच दगड ठेवून त्याला चुना आणि कावाने रंगविले जाते. त्याला पांडव असे म्हटले जाते. या पांडवांची वेळअमावस्येला शेतकरी कुटुंबिय पूजा करतात. याशिवाय शेतामध्ये खरीप हंगामातील तूर तर रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू, करडई आदी पिके असतात. या पिकांबरोबरच शेतातील लक्ष्मीचीही पूजा केली जाते. त्यानंतर पिकांवर अंबिल शिंपून हर- हर महादेवचा जयघोष करून हा हंगाम चांगला होऊ दे, अशी प्रार्थना शेतकरी करतात. पांडव, लक्ष्मीला शेंगाचे लाडू, अंबिल, उंडे, भात, दाळ आदींचा नैवेध दाखविला जातो. याशिवाय पांडवापुढे विविध प्रकारची फळेही ठेवली जातात. दिवे प्रज्ज्वलित करून मनोभावे पूजा केली जाते. काही ठिकाणी 'वलघ्या, वलघ्या... सालम पलघ्या' असा घोष करून, कोपीला प्रदक्षिणा घातली जाते. 

Image may contain: one or more people, people riding horses, outdoor and nature

वनभोजनाचा आनंद

वेळअमावस्येदिवशी संपूर्ण शेतकरी कुटुंबीय शेतात जाते. यासाठी जेवणाचा खास बेत असतो. बाजरीपासून तयार केलेले उंडे, ताक व पीठ मिसळून केलेले अंबिल, शेंगदाणे व गुळाची पोळी, दाळ, विविध प्रकारच्या भाज्या एकत्रित करून केलेली भाजी, भात, असे पदार्थ असतात. काही ठिकाणी गव्हाची खीरही केली जाते. या पदार्थांची तयारी गृहिणी पहाटेपासून करतात. यासाठी शेतकरी आपल्या मित्रपरिवारांना शेतामध्ये वनभोजनाचा आस्वाद घेण्यासाठी निमंत्रित करतात. अंबिल ठेवण्यासाठी खास मडके तयार केलेले असते. कुटुंबप्रमुखाने डोक्यावर घोंगड्याची टोप करून त्यावर अंबिलने भरलेले हे मडके ठेवून न बोलता शेतापर्यंत पायी जाण्याची परंपरा आहे. त्यानंतर कुटुंबातील सर्वजण बैलगाडी किंवा मिळेल त्या वाहनातून शेताकडे जातात.

Image may contain: one or more people, shoes and outdoor

अघोषित संचारबंदी

वेळअमावस्येदिवशी दुपारनंतर जिल्ह्यातील सर्वच शहरामध्ये अघोषित संचारबंदीसारखी परिस्थिती असते. व्यापारीही सकाळी अकरापासून दुकाने बंद करून शेताकडे जातात. शेती नसणारे अनेक कुटुंबिय निमंत्रण दिलेल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन वनभोजनाचा आनंद घेतात. ग्रामीण भाग असो की शहरी, यादिवशी बहुतांश नागरिक शेताकडे जात असल्यामुळे शिवारे गर्दीने फुललेली असतात तर शहर व गावे ओस पडलेली असतात. दुपारपासून सायंकाळपर्यंत ही परिस्थिती असते. गेल्या दोन- तीन दिवसांपासून अंबिलसाठी लागणारे मडके, विविध प्रकारच्या पालेभाज्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची धांदल सुरू आहे.

वलघ्या, वलघ्या... सालम पलघ्या

'वलघ्या...' म्हणजेच यंदा पीक जोमात आले आहे. हे परमेश्‍वरा यंदाचे हे साल चांगली आबादानी होऊ दे.. अशी भावना) पूजेनंतर सामूहिक भोजन केले जाते. हंगामात आलेल्या द्विदल प्रकारातील तूर, हरभरा, वाटाणा, वाल, चवळी यासह कांद्याची पात, भाजीपाला आदी बेसन पिठात मिसळून केलेल्या भाजीला 'भज्जी' म्हणतात. सोबत एक ग्लास अंबिल पिण्यासाठी देतात. कोंथिबीर, लसूण, जिरे आणि थोडेसे मीठ मिसळून केलेली आंबिलची चवही न्यारी असते. दिवसभर परिसरातील शेतकरी एक दुसऱ्याच्या शेतात जाऊन 'भज्जी'ची चव चाखून आनंद लुटतात. यात तरुण शेतकरी, युवक- युवती, आबालवृद्ध सहभागी होतात. मुले पतंग उडविण्यात मश्‍गूल असतात. संध्याकाळी टोपल्यांत देव मांडून सर्व जण घराकडे परततात. शेतातील लक्ष्मीची पावले घराला लागल्याचे समाधान व आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून येतो. 

Image may contain: 1 person, standing and outdoor

नेमके कारण दडलेय महाभारतात

पांडवांना कौरवांनी राज्याबाहेर हाकलून लावले. त्यावेळी वनातून जात असताना पांडव एका शेतात थांबले व तेथे एकत्र बसून जेवण केले. जेवणाने तृप्त होऊन त्यांनी शेतकऱ्याला भरघोस पीक येण्याचा आशीर्वाद दिला. तो दिवस वेळा अमावस्येचा होता. आपल्याही शेतात भरघोस पीक यावे, या भावनेने या दिवशी शेतात सहकुटुंब भोजन करून शेतकरी पांडवांची पूजा करतात. 

Image may contain: one or more people, people standing, outdoor and nature

काही गावांत संक्रांतीची प्रथा

लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांत वेळा अमावस्या उत्साहाने साजरी केली जाते, पण या दोन्ही जिल्ह्यांतील काही गावांमध्ये मात्र ती मकर संक्रांतीच्या दिवशी साजरी केली जाते. याचे कारण इतिहासात दडले आहे. निजाम राजवटीत असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील भातांगळी, कास्ती (बु.), कास्ती (खु.), खेड, नागूर, कारेगाव, यासह लातूर जिल्ह्यातील उजनी (ता. औसा) या गावांतील बहुतांश लोकांना निजामाने अमावस्येच्या आदल्या दिवशी अटक केली होती, त्यामुळे दुसऱ्या दिवशी या गावांत वेळ अमावस्या साजरी झाली नाही. हे लोक निजामाच्या तावडीतून सुटून आल्यानंतर ग्रामस्थांनी वेळ अमावस्या मकरसंक्रांतीला साजरी करण्याचे ठरविले. आजही या गावांमध्ये वेळ अमावस्या मकरसंक्रांतीलाच साजरी केली जाते.

हेही वाचा - 

बीडचा सह्याद्री देवराई प्रकल्प महाराष्ट्रात पथदर्शी ठरेल - सयाजी शिंदे

फटाका तोंडात फोडला...अन असे घडले...

समृद्धी महामार्गाच्या कामाचा असाही साईड इफेक्ट, वाचा-

कॅब, एनआरसीसंदर्भातील आंदोलनाला यापुढे परवानगी नाही


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vela Amavasya To be Celebrated Today in Latur, Osmanabad in Marathwada