भजी तळत पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांनी केला शासनाचा निषेध

कैलास चव्हाण
मंगळवार, 19 मार्च 2019

दहावीनंतर डिप्लोमा अर्थात पदवीका अभ्यासक्रम पूर्ण (एलएसएस) करणाऱ्या सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांना चक्क पशुधन विकास या वर्ग एक पदावर पदोन्नती पशुवैद्यक डॉक्टर बनवण्याचा प्रकार केला असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

परभणी : पशुसंवर्धन विभागाने सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांना बेकायदेशीरत्या पदोन्नती दिल्याचा निषेध करत येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुरु केलेले आंदोलन चांगलेच पेटले असून आंदोलनाच्या आठव्या दिवशी मंगळवारी (ता. 19) विद्यार्थ्यांनी भजे तळत शासनाचा निषेध केला आहे.

राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने 11 मार्चला गट 'क' अंतर्गत येणाऱ्या 125 
सहायक पशुसंवर्धन विकास अधिकाऱ्यांना पदोन्नती करत पशुधन विकास अधिकारी गट 'ब' या पदावर बढती दिली. दहावीनंतर डिप्लोमा अर्थात पदवीका अभ्यासक्रम पूर्ण (एलएसएस) करणाऱ्या सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांना चक्क पशुधन विकास या वर्ग एक पदावर पदोन्नती पशुवैद्यक डॉक्टर बनवण्याचा प्रकार केला असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. अवैधरित्या दिलेली पदोन्नती मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र पशुवैद्यकीय विद्यार्थी संघटना कृति समितीच्या नेतृत्त्वात परभणी पशुवैद्यकीय महाविद्यालय, अकोला, मुंबई, उदगीर, शिरवळ येथील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मंगळवार (ता. 12) पासून विविध आंदोलन सुरू केली आहेत. बुधवारी (ता. 13) पशुवैद्यकीय चिकित्सालयातील तपासणी बंद ठेवली. गुरुवारी (ता. 14) महाविद्यालयास टाळे ठोकून प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाची शासन दखल घेत नसल्याने आठव्या दिवशी मंगळवारी (ता. 19) विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रवेशद्वारावर भजे तळून शासनाचा निषेध केला. चहा, पोहे बनवत पदवीधर डॉक्टरांना आता या पोटभरण्यासाठी हा व्यवसाय करण्याची वेळ शासनाने आणल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

 

Web Title: Veterinary students of Parbhani protested against the government