‘रॅगिंग’ विरोधात कुलगुरू डॉ. म्हैसेकर पॅटर्न

शिवचरण वावळे
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

0- विद्यार्थ्यांमध्ये असलेले मतभेद दूर व्हावेत
0- विद्यार्थी प्रिय असलेले कुलगुरू डॉ. म्हैसेकरांचा उपक्रम
0- त्यांचा ‘शून्य टक्के रॅगिंग पॅटर्न चर्चेत

नांदेड : महाविद्यालयीन युवकांमध्ये लहान सहान गोष्टीमुळे ‘इगो हर्ट’ होण्याच्या भावनेतून एकमेकांची रॅगिंग झाल्याचे अनेक प्रकरणे आहेत. रॅगिंगमुळे अनेक विद्यार्थ्यांचे करिअरचे नुकसान झाले तर काही जणांनी जीवन संपवले आहे. त्यामुळे अशा घटना घडू नयेत, यासाठी विद्यार्थ्यांमध्ये असलेले मतभेद दूर व्हावेत यासाठी नाशिक आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे. त्यांनी ‘शून्य टक्के रॅगिंग पॅटर्न’ तयार केला असून तो राबविला जात आहे. 
 
   
डॉ. म्हैसेकर यांनी यापूर्वी नांदेडला डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रभारी अधिष्ठाता तसेच पल्मोनरी मेडीसीन विभागाचे विभागप्रमुख म्हणून त्यांच्याकडे प्रशासकीय कामाचा चांगला अनुभव आहे. या अनुभवाच्या जोरावर तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांनी त्यांची दोन वर्षापूर्वी नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड केली. विद्यार्थी प्रिय असलेले कुलगुरू डॉ. म्हैसेकर हे सध्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी व त्यांचे प्रश्न अडीअडचणी जाणून घेऊन त्यावर उपायोजना करण्यासाठी राज्यभर दौरा करत आहेत. 

राज्यातील दहा महाविद्यालयास भेट

नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी त्यांनी नुकतीच दोन दिवसापूर्वी मनमोकळी चर्चा केली. यापूर्वी त्यांनी राज्यातील दहा महाविद्यालयास भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. पुढील काळात महाराष्ट्रातील पावणेचारशे महाविद्यालयास ते भेटी देणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. म्हैसेकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. कुलगुरू डॉ. म्हैसेकर यांच्या या पॅटर्नची चर्चा राज्यभरातील महाविद्यालयात आता रंगू लागली आहे. 

काय म्हणाले कुलगुरू ?
 
सध्या राज्यात पावणेचारशेच्या जवळपास महाविद्यालये असून यातील तीनशे महाविद्यालयात रॅगिंग प्रकार कमी झाला आहे. परंतु आजही काही महाविद्यालयात हा प्रकार लपून छपून सुरु आहे. त्यामुळे नेमके रॅगिंगचे कारण शोधण्यासाठी हा वेगळा व महत्वकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. भविष्यात हीच पिढी एक आदर्श विद्यार्थी म्हणून पुढे येणार आहे. तेव्हा त्यांच्यापासून रॅगिंग प्रकारास मूठमाती देण्यासाठी कामातून वेळ काढून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात येत आहेत. 

नॅशनल ॲन्टी रॅगिंग हेल्पलाईन 

विद्यार्थ्यांनी सिनीअर - ज्युनिअर असा वाद न करता एकमेकांसोबत मित्रत्वाने रहावे व कुणाचीही अवहेलना होऊ नये आणि रॅगिंग झालेला विद्यार्थी निराशेच्या खाईत ढकलला जाऊ नये, यासाठी ‘नॅशनल ॲन्टी रॅगिंग हेल्प लाईन नंबर’ वर माहिती देता येते. पुढे हीच माहिती नजिकच्या पोलीस ठाणे व संबंधित महाविद्यालयास मिळते. या हेल्पलाईनमुळे अनेकांनी आपले भविष्य खराब होऊ नये, या भीतीपोटी रॅगिंग हा प्रकार बंद केला आहे. त्यामुळे काही प्रमाणात आळा बसला असला तरी, काही ठिकाणी हा प्रकार अजून थांबलेला नाही. 

कुलगुरुच्या भेटीने विद्यार्थ्यांमध्ये आनंद

आजपर्यंत विद्यार्थ्यांचे म्हणणे कुणीही एकूण घेत नव्हते. त्यामुळे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यात दोन हात दुरावा राहत होता. परंतु हे कुलगुरू विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि त्यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. नांदेड शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी देखील कुलगुरूच्या या उपक्रमातून ‘रॅगिंग शून्य’ सहज साध्य करता येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. आम्ही सिनिअर व ज्युनिअर असा वाद न करता एका दिलाने राहू आणि एक आदर्श विद्यार्थी म्हणून ज्युनिअरसाठी रोल मॉडेल बनून दाखवू, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vice-Chancellor Dr. Ragging Mhasecar pattern