विदर्भासोबतच स्वतंत्र मराठवाडा राज्य करा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मार्च 2017

व्यापक चळवळ उभारणार; मराठवाडा मुक्ती मोर्चाचा निर्धार

व्यापक चळवळ उभारणार; मराठवाडा मुक्ती मोर्चाचा निर्धार

औरंगाबाद- हिंदी भाषिकांची दहा राज्ये असू शकतात, तर मराठी भाषिकांचे तीन राज्ये झाली तर बिघडले कुठे? जगात मराठवाड्याच्या भूभागापेक्षा छोटे 60 देश आहेत. देशातील दहा राज्ये मराठवाड्यापेक्षा लहान आहेत. मराठवाड्याच्या हक्काचा पैसा पश्‍चिम महाराष्ट्रात वळविला जातो. बुलेट ट्रेन, मेट्रो ट्रेन फक्त पश्‍चिम महाराष्ट्रातच का? बीडची रेल्वे आजही कागदावरच आहे. त्यात आता विदर्भ वेगळा होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. विदर्भासोबतच स्वतंत्र मराठवाडा राज्य करावे, यासाठी येत्या काळात मोठी चळवळ उभारली जाईल, अशी माहिती मराठवाडा मुक्ती मोर्चाच्या वतीने शनिवारी (ता. 18) देण्यात आली.

मराठवाडा मुक्ती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बाबा उगले, जे. के. जाधव, द्वारकादास पाथ्रीकर, भगवानराव कापसे, डॉ. अनुपमा पाथ्रीकर, रत्नाकर खंडागळे पत्रकार परिषदेत म्हणाले, की स्वातंत्र्यापासून मराठा आणि विदर्भावर अन्याय झालेला आहे. प्रशासकीय दृष्टीने छोटी राज्ये अत्यंत प्रभावी असतात, असे मत 1955 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केले होते. हिंदी भाषिकांची दहा राज्ये आहेत, तर मराठीचे तीन, चार राज्ये असतील तर काय बिघडणार आहे, तेलगू भाषिकांचे तेलंगाणा आणि आंध्र प्रदेश राज्य झाले. वेगळे राज्य मागणीला मराठवाड्यातील राजकारणी कारणीभूत आहेत. "आयआयएम', विधी विद्यापीठ, कृषी आयुक्त कार्यालय, जलसंधारण कार्यालय, "साई' या संस्था पळविल्या. मराठवाड्यातील पुढारी "ब्र'सुद्धा काढताना दिसत नाही.

मागील चार महिन्यांपूर्वी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की उत्तराखंड वेगळे झाले त्यावेळेस 27,000 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प होता आता तोच अर्थसंकल्प 72,000 कोटींचा आहे. त्यामुळे छोटे राज्य झाले पाहिजे, असे आमचे मत असल्याचे या वेळी सांगण्यात आले. मराठवाडा वेगळा झाला तर खाणार काय, हा प्रश्‍न विचारला जातो. मराठवाड्याची जमीन अतिशय सुपीक आहे. सर्वाधिक कापूस पिकतो. पिकांमध्ये विविधता आहे. कन्नडपासून निघाले तर किनवटला पोचेपर्यंत दिवस जातो. अशा विस्तीर्ण प्रदेशाचे विदर्भासोबच स्वतंत्र राज्य झाले पाहिजे. त्यासाठी येत्या काळाच मोठी चळवळ उभी केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

Web Title: vidarbha independent state region