chalisgaon bjp challenge of rebels mangesh chavan
chalisgaon bjp challenge of rebels mangesh chavan

Vidhan Sabha 2016 : चाळीसगावमधील बंडखोरी भाजप रोखणार तरी कशी?

चाळीसगाव : चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात भाजपला बंडखोरीचा सामना करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या दोन दिवसांत बंडोबा थंड होतील, असा विश्वास पत्रकार परिषदेत व्यक्त केला होता. पण, चाळीसगावमध्ये मात्र भाजपपुढे बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान आहे.

पदाधिकाऱ्यांची नाराजी
अर्ज दाखल करण्यासाठी शेवटी अर्धा तास राहिलेला असताना पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती संजय भास्कर पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे, हा अर्ज दाखल करतेवेळी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे संजय पाटील यांनी माघार घेतली नाही तर, त्यांची ही उमेदवारी भाजपचे अधिकृत उमेदवार मंगेश चव्हाण यांना डोकेदुखी ठरणार आहे. येथील भाजपमध्ये सुरवातीपासूनच गटबाजी आहे. त्यामुळे विधानसभेसाठी सर्वानुमते एक उमेदवार तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी देऊ शकले नाही. पक्षातर्फे जळगावला इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या गेल्या, त्या वेळी सर्वाधिक संख्या चाळीसगावातील इच्छुकांची होती. खासदार उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील या देखील इच्छुक होत्या. उमेदवारीसाठी काही इच्छुक तर मुंबईत तळ ठोकून होते. मंगेश चव्हाणांऐवजी दुसऱ्याला तिकीट द्यावे, अशी मागणी काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुंबईला जाऊन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. त्यामुळे भाजपकडून उमेदवारांची नावे जाहीर होताना चाळीसगावसाठीचे नाव सर्वांत शेवटी जाहीर होईल, असे वाटत होते. मात्र, पहिल्याच यादीत मंगेश चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली. त्यानंतर पक्षातील काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 

मंगेश चव्हाणांसाठी डोकेदुखी
खासदार उन्मेष पाटील यांच्या कार्यालयाच्या आवारात कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करून उमेदवार बदलून देण्याची मागणी केली. हा विषय बहुधा वरिष्ठांपर्यंत गेल्यानंतर पक्षाचा आदेश पाळून खासदारांसह इतर पदाधिकाऱ्यांना भाजपचे अधिकृत उमेदवार मंगेश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी उपस्थिती द्यावी लागली. श्री. चव्हाण यांचा अर्ज दाखल असताना शेवटच्या अर्ध्या तासात खासदार उन्मेष पाटील यांचे कट्टर समर्थक तथा पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान उपसभापती संजय भास्कर पाटील यांनीही एक भाजप व दुसरा अपक्ष असे दोन अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केले. त्यामुळे हा प्रकार भाजपमध्ये बंडखोरी होत असल्याचा दिसत आहे. भाजपमध्ये ज्या ज्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मंगेश चव्हाण यांच्या उमेदवारीला विरोध आहे, असे सर्व जण पक्षाचा आदेश म्हणून मंगेश पाटलांचा प्रचार करताना किंबहुना त्यांच्यासोबत दिसले तरी ते त्यांना मतदान करतीलच असे नाही. शिवाय संजय पाटील हे ज्या गावातील आहेत, त्या पातोंडा गावात सर्वाधिक मतदार आहेत. त्यांचा गोतावळा देखील तालुक्यात मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे माघारीनंतर संजय पाटील यांची उमेदवारी राहिली तर ती भाजपच्या मंगेश चव्हाणांसाठी डोकेदुखी ठरल्याशिवाय राहणार नाही, अशी चर्चा सध्या होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com