Vidhan Sabha 2019 : भाजप-शिवसेनेचे स्थान बळकट; काँग्रेस आघाडीची वाट बिकट

भास्कर बलखंडे
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

जालना जिल्ह्यात गत विधानसभा निवडणुकीत पाचपैकी घनसावंगी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे राजेश टोपे, तर जालन्यातून शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजपचे भोकरदनमधून संतोष दानवे, बदनापुरातून नारायण कुचे आणि परतूर मतदारसंघातून बबनराव लोणीकर यांनी विजय मिळविला होता. हा निकाल पाहता भाजप-शिवसेना, तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढले तर जिल्ह्यात युतीचे स्थान बळकट तर आघाडीची वाट बिकट, असे चित्र आहे.

विधानसभा 2019 : जालना जिल्ह्यात गत विधानसभा निवडणुकीत पाचपैकी घनसावंगी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे राजेश टोपे, तर जालन्यातून शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजपचे भोकरदनमधून संतोष दानवे, बदनापुरातून नारायण कुचे आणि परतूर मतदारसंघातून बबनराव लोणीकर यांनी विजय मिळविला होता. हा निकाल पाहता भाजप-शिवसेना, तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढले तर जिल्ह्यात युतीचे स्थान बळकट तर आघाडीची वाट बिकट, असे चित्र आहे.

जिल्ह्यातील भोकरदन, जालना, बदनापूर हे मतदारसंघ लोकसभेच्या जालना मतदारसंघात येतात. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारापेक्षा तब्बल साडेतीन लाखांवर मताची आघाडी घेतली, त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसमोर जबरदस्त आव्हान आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांनी पदाच्या माध्यमातून विविध प्रकारचे प्रकल्प जिल्ह्यात आणून विकासकामांचा धडका लावला. त्यामुळे त्यांना विरोधकांवर मात करता आली. जिल्ह्यात भाजपला बळकटी आली. त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. अशा प्रकारे एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला जालना जिल्हा भाजपकडे केव्हा गेला, हे कळलेसुद्धा नाही.

जालन्यात खोतकर आणि काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांच्यात २०१४ च्या निवडणुकीत अटीतटीचा सामना झाला. यात खोतकर वरचढ ठरले. दरम्यान, पुढे त्यांच्या निवडीला आव्हान देणारा खटला उच्च न्यायालयात दाखल झाल्याने ही निवडणूक खूपच गाजली होती. हा खटला आता सर्वोच्च न्यायालयात आहे. येत्या निवडणुकीतही या दोन नेत्यांमधील लढत रंगतदार होईल. मतदारसंघातील स्थानिक प्रश्नांवरून रस्सीखेच आहे. पाणीप्रश्न कळीचा मुद्दा ठरू शकतो. 

भोकरदनमधून रावसाहेब दानवे यांचे पुत्र आमदार संतोष यांना येणाऱ्या निवडणुकीत वडिलांची पुण्याई कामी येणार आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेले माजी आमदार चंद्रकांत दानवेंना पुन्हा वेंटिगच्या रांगेत उभे राहावे लागते की काय, अशीही चर्चा आहे. दुरावलेले कार्यकर्ते आणि वंचित आघाडीकडे आकर्षित युवक वर्ग यामुळे त्यांचे अस्तित्व पणाला लागणार आहे.

बदनापूर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्यामुळे या मतदारसंघात अनेकजण इच्छुक आहेत. मतदारसंघातील आमदार नारायण कुचे यांना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचे पाठबळ आहे. त्यामुळे गेल्या साडेचार वर्षांत त्यांनी विकास निधीचा पुरेपूर वापर केला. परंतु, वंचित आघाडीमुळे दलित, मुस्लिमांसह अन्य छोटे समूह एकत्र आल्यास त्यांच्यापुढे आव्हान उभे राहू शकते. यामुळे मतदारसंघातील लढत रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. वंचितकडून या मतदारसंघातून ॲड. शिवाजी आदमाने, माजी सभापती सुदामराव सदाशिवे, सुधाकर निकाळजे, डॉ. अश्विनी गायकवाड यांच्यासह अनेक इच्छुक आहेत. मात्र, वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भूमिका अद्याप गुलदस्तात आहे. त्यामुळे या मतदारसंघातून तिकिटाची कोणाला लॉटरी लागते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. राष्ट्रवादीकडून बबलू चौधरी इच्छुक आहेत. जिल्ह्यात कम्युनिस्ट, बसप, मनसे या पक्षांची शक्ती मर्यादीत आहे.

लोकसभेच्या परभणी मतदारसंघात परतूर आणि घनसावंगी विधानसभा मतदारसंघ येतात. २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांना दोन्ही मतदारसंघांनी मोठे मताधिक्‍य दिले आहे.

परतूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर करतात. मतदारसंघातील अस्तित्वाची लढाई जिंकण्यासाठी त्यांनी प्रारंभीपासूनच विकास मार्ग अवलंबिला आहे. वॉटरग्रीड योजना असो वा दिंडी मार्ग प्रत्येकाच्या बाबतीत जातीने त्यांनी लक्ष घातलेले दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रेट्यामुळे सारे मतभेद बाजूला ठेवत पक्षातील सहकार्यांसोबत दानवे असो किंवा लोणीकर हे झपाटून कामे करताना दिसतात. आता परतूर मतदारसंघात रस्त्यासह झालेल्या अन्य विकासकामांमुळे येथून काँग्रेसकडून इच्छुक असलेले माजी आमदार सुरेश जेथलिया यांच्यासाठी निवडणूक कठीण आहे. जातीय समीकरणाचा त्यांना कितपत फायदा होतो, यावरच त्यांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे.

घनसावंगी मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांची पकड मजबूत आहे. समर्थ सहकारी साखर कारखाना, सागर साखर कारखाना, दूध संस्था, शिक्षण संस्था असे सहकार आणि शिक्षणसंस्थेचे मजबूत जाळे ही त्यांची ताकद आहे. आघाडी सरकारच्या काळात उच्च शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी प्रभावही दाखविलेला आहे. त्यांच्यासमोर शिवसेनेचे आव्हान असेल. शिवसेनेचे हिकमत उढाण यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून पुढे आहे.

शिवाय भाजपचे नेते तथा माजी आमदार विलासराव खरात, शिवसेनेचे माजी आमदार शिवाजी चोथे यांच्या भूमिकाही महत्त्वपूर्ण राहतील. विशेष म्हणजे राष्ट्रवादीप्रमाणेच शिवसेनेचे संघटनात्मक जाळे या मतदारसंघात मजबूत आहे. त्यामुळे येथील लढतही चुरशीची मानली जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha Election 2019 BJP Shivsena Congress Aghadi Politics