Vidhan Sabha 2019 : ऐनवेळी बदलणार राजकीय समीकरणे

राजेंद्रकुमार जाधव
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

लोकसभेच्या निवडणुकीत उस्मानाबाद मतदारसंघातून शिवसेनेला अपेक्षित यश मिळत असले, तरी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांपैकी उमरगा वगळता उर्वरित तीन मतदारसंघांत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसलाच झुकते माप मिळते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित विकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांमुळे आघाडीसमोर जागा राखण्याचे आव्हान आहे. गेल्या पाच वर्षांत भाजपने पक्षीय संघटन वाढविल्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप भोपळा फोडणार का, याची उत्सुकता आहे.

विधानसभा 2019 : लोकसभेच्या निवडणुकीत उस्मानाबाद मतदारसंघातून शिवसेनेला अपेक्षित यश मिळत असले, तरी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांपैकी उमरगा वगळता उर्वरित तीन मतदारसंघांत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसलाच झुकते माप मिळते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित विकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांमुळे आघाडीसमोर जागा राखण्याचे आव्हान आहे. गेल्या पाच वर्षांत भाजपने पक्षीय संघटन वाढविल्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप भोपळा फोडणार का, याची उत्सुकता आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा आणि परंडा अशा चार विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. आघाडीतून उस्मानाबाद, परंडा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे, तर तुळजापूर, उमरगा काँग्रेसकडे आहे. युतीतून उस्मानाबाद, परंडा, उमरगा मतदासंघ शिवसेनेकडे, तर तुळजापूर भाजपकडे आहे. जिल्ह्यात अद्यापही भाजपचा आमदार निवडून आला नसल्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपला मतदार संधी देणार का, हा प्रश्न आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला साथ देणाऱ्या या जिल्ह्यात विधानसभेला मात्र चित्र आघाडीच्या बाजूने असते, असा आजवरचा इतिहास आहे.

उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून २०१४ मध्ये शिवसेनेचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर व राष्ट्रवादीचे राणाजगजितसिंह पाटील यांच्यात लढत होऊन त्यात पाटील विजयी झाले. २०१९ मधील लोकसभेच्या निवडणुकीतही हे दोघेच एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. त्यात शिवसेनेचे राजेनिंबाळकर निवडून आले. विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून ‘राष्ट्रवादी’कडून आमदार पाटील यांची उमेदवारी निश्‍चित मानली जाते. तर शिवसेनेकडून उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, कळंबचे माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे, संजय पाटील दुधगावकर यांच्या नावांची चर्चा आहे.

भाजपकडून जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, नितीन काळे, सुरेश पाटील, काँग्रेसकडून माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे यांच्या नावांची चर्चा आहे.
तुळजापूर मतदारसंघातून काँग्रेसचे मधुकरराव चव्हाण यांनी सलग चारवेळा विजय मिळविला आहे. त्यामुळे याही निवडणुकीत काँग्रेसचे तेच उमेदवार असतील. त्यांच्याविरोधात भाजपकडून रोहन देशमुख, तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी, शिवसेनेकडून संजय निंबाळकर, जिल्हाप्रमुख कैलास पाटील, ‘राष्ट्रवादी’कडून जीवनराव गोरे यांच्या नावांची चर्चा आहे.

उद्योजक अशोक जगदाळे, जिल्हा परिषदेचे सदस्य महेंद्र धुरगुडे यांनीही निवडणुकीची तयारी चालवली आहे. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे.

संघटन वाढविण्यावर भर
परंडा मतदारसंघात सलग तीनवेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल मोटे यांनी विजय मिळविलाय. त्यामुळे राष्ट्रवादीकडून तेच उमेदवार असतील, हे निश्‍चित आहे. शिवसेनेकडून जलसंधारणमंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी तयारी चालवली आहे. गेल्या दोन वर्षांत सावंत यांनी या मतदारसंघात प्राबल्य वाढविले आहे. त्यांच्याशिवाय माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, शंकर बोरकर, सुरेश कांबळे यांच्याही नावांची चर्चा आहे. 

भाजपकडून भूमचे माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष प्रशांत चेडे, राष्ट्रीय समाज पक्षाकडून बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर, जनता दलाकडून (धर्मनिरपेक्ष) ॲड. रेवण भोसले यांच्या नावाची चर्चा आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी येथे संघटन वाढविण्यावर भर दिलाय. 

उमरगा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तो अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले यांनी २००९ आणि २०१४ मधील निवडणुकीत सलग दोनवेळा विजय मिळवलाय. त्यामुळे याही वेळी त्यांनाच उमेदवारी मिळणार, हे निश्‍चित आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसकडे सध्या तरी तुल्यबळ उमेदवार नाही. काँग्रेसकडून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप भालेराव, भाजपकडून कैलास शिंदे यांच्या नावांची चर्चा आहे. दरम्यान, बहुजन वंचित विकास आघाडीने जिल्ह्यातील चारही मतदारसंघांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha Election 2019 Osmanabad District Politics