Vidhansabha 2019 : निकालच ठरवणार अनेकांच्या वाटचालीची दिशा

Beed
Beed

प्रतिष्ठेच्या लोकसभेच्या बीड मतदारसंघातील निवडणुकीत काठावरील काही मोहरे टिपण्यात पंकजा मुंडेंना यश आले असले, तरी या वेळी ‘राष्ट्रवादी’मधून ‘अंधारातून भाजपला साथ’ देण्याची परंपरा मोडीत निघाली आहे. या निकालातून पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, विनायक मेटे, जयदत्त क्षीरसागर यांच्या राजकीय वाटचालीची दिशा, भाजपच्या चार आमदारांच्या उमेदवारीचा फैसला होईल. 

लोकसभेच्या बीड मतदारसंघात बीड, गेवराई, केज, माजलगाव, परळी आणि आष्टी हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. भाजपच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे आणि ‘राष्ट्रवादी’चे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्यात सरळ लढत झाली. पक्षीय ताकदीपेक्षा यंदा जातीय समीकरणांवर निकालाचे गणित मांडले जात आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे होमपिच परळीच्या आघाडीवर या दोन्ही नेत्यांच्या विधानसभेचे भवितव्य ठरणार आहे.

केजमध्ये सूनबाई नमिता मुंदडांच्या विधानसभेच्या धूळपेरणीसाठी नंदकिशोर मुंदडांनी ‘राष्ट्रवादी’कडून झोकून दिले. उमेदवार सोनवणेंचेही केज होमपिच असून, त्यांना पृथ्वीराज साठे, काँग्रेस नेत्या रजनी पाटील, जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदींचीही साथ मिळाली; तर भाजपकडून आमदार संगीता ठोंबरे आणि ज्येष्ठ नेते रमेश आडसकर यांनी धुरा सांभाळली. मात्र, लोकप्रतिनिधींवरील नाराजी भाजपसाठी शेवटपर्यंत डोकेदुखी ठरली.

बीडमध्ये ‘राष्ट्रवादी’चे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी ऐनवेळी कूस बदलत भाजपच्या मुंडेंच्या पारड्यात वजन टाकत ‘मातोश्री’ची पायरी चढताच महायुतीतील घटकपक्ष ‘शिवसंग्राम’चे अध्यक्ष विनायक मेटे यांनीही सोनवणेंना साथ देण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. त्यामुळे हा निकाल दोघांची पुढील दिशा ठरवणारा असेल. या ठिकाणी ‘राष्ट्रवादी’चे संदीप क्षीरसागर जोर लावत असताना, काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश नवले यांच्यासह राजेंद्र जगताप, सुनील धांडे, उषा दराडे, जनार्दन तुपे यांनीही ‘राष्ट्रवादी’साठी मेहनत घेतली. गेवराईत ‘राष्ट्रवादी’कडून प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी पक्षासाठी झोकून दिले. भाजपसाठी आमदार लक्ष्मण पवारांसह शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित दोघेही मैदानात होते. मात्र, विधानसभेला उमेदवार कोण, या शंकेने कार्यकर्त्यांची अस्वस्थता शेवटपर्यंत कायम राहिली.

माजलगावमध्येही ‘राष्ट्रवादी’साठी माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी प्रतिष्ठेसाठी जिवाचे रान केले. भाजपसाठी आमदार आर. टी. देशमुखांसह रमेश आडसकर, मोहन जगताप यांनीही ताकद लावली. भाजपचे सुरेश धस आणि भीमराव धोंडे हे दोन आमदार, जिल्हा परिषद अध्यक्षांसह इतर सत्तास्थाने असल्याने आष्टी भाजपचा बालेकिल्ला मानला गेल्याने सर्वांचे ‘लक्ष’ या मतदारसंघावर होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत ‘राष्ट्रवादी’कडून बाळासाहेब आजबे, सतीश शिंदे, महेंद्र गर्जे, महेबूब शेख यांनी केलेल्या मेहनतीतून पक्षाची पडझड किती रोखली जाते, हे लवकरच कळणार आहे.

असा आहे राजकीय पट
    महायुतीतील घटकपक्ष शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटेंनी भाजपविरोधी भूमिका घेतली
    मेटे यांच्या उमेदवारीला पंकजा मुंडे विरोध करण्याची शक्‍यता
    ‘राष्ट्रवादी’चे जयदत्त क्षीरसागर यांची भाजपच्या प्रीतम मुंडेंना मदत. सध्या ते शिवसेनेच्या संपर्कात 
    आष्टीत भीमराव धोंडे भाजपचे आमदार असले, तरी सुरेश धस यांच्याकडून मुलाच्या उमेदवारीसाठी प्रयत्न शक्‍य
    आघाडीत काँग्रेसच्या हक्काची एकमेव परळीची जागा धनंजय मुंडेंना सोडल्यास काँग्रेस कुठून लढणार, असा पेच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com