Vidhansabha 2019 : इच्छुकविरुद्ध विद्यमानांतच लढाई शक्‍य

Parbhani-Loksabha
Parbhani-Loksabha

विधानसभेच्या उमेदवारीवर डोळा ठेवून इच्छुकांनी पक्षीय उमेदवारांसाठी काम केले आहे. पण पक्षीय आघाडी, युतीने अनेकांच्या स्वप्नांना सुरुंग लागू शकतो. त्यामुळे बंडखोरीही सतावणार आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची चर्चा झडताहेत. परभणी लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांच्या आगामी निवडणुकांमध्ये इच्छुक विरुद्ध विद्यमान यांच्यात लढत रंगण्याची शक्‍यता आहे. सहाही विधानसभा मतदारसंघातील इच्छुक आणि विद्यमान आमदारांनी लोकसभेत स्वपक्षाच्या उमेदवारांच्या विजयासाठी दिलेल्या वाट्याचे फळ मिळणार आहे.

मतदारसंघात परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, गंगाखेड आणि पाथरी; तर जालना जिल्ह्यातील घनसावंगी व परतूर असे सहा लोकसभेसारखी विधानसभेलाही युती आणि आघाडी झाली तर बहुतांश मतदारसंघात इच्छुकांच्या स्वप्नावर पाणी फेरले जाऊ शकते. युतीमध्ये परभणी, जिंतूर, पाथरी, घनसावंगी शिवसेनेकडे तर गंगाखेड आणि परतूर भाजपकडे आहेत.

आघाडीत परभणी, पाथरी, परतूर काँग्रेसकडे; तर गंगाखेड, जिंतूर, घनसावंगी हे विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आहेत.
परभणी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून आमदार डॉ. राहुल पाटील हे निश्‍चित आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे संजय जाधव यांचे काम केले. याच मतदारसंघातून भाजपचे आनंद भरोसेदेखील इच्छुक आहेत. त्यांनी विधानसभा समोर ठेवून लोकसभेला युती धर्म निभावत जाधव यांचे काम केले. परंतु युती झाली तर आनंद भरोसेंचे काय होणार हा प्रश्‍न आहे. आघाडीत ही जागा काँग्रेसकडे आहे. येथून काँग्रेसच्या इच्छुकांची यादी मोठी आहे. 

पाथरी विधानसभा मतदारसंघातील मोहन फड भाजपचे सहयोगी आमदार आहेत. त्यांनी प्रचारात जाधवांविरोधात भूमिका घेतल्याचे स्पष्ट जाणवत होते. त्यांच्या समर्थकांनी उघडपणे राष्ट्रवादीचे राजेश विटेकरांचे काम केले. हा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर येथून इच्छुक आहेत. या ठिकाणी शिवसेनेच्या माजी आमदार मीरा रेंगे, डॉ. संजय कच्छवे इच्छुक आहेत.

राष्ट्रवादीचे डॉ. मधुसूदन केंद्रे गंगाखेडचे आमदार आहेत. परंतु या मतदारसंघातून त्यांच्यासमोर माजी आमदार सीताराम घनदाट यांचे आव्हान उभे राहू शकते. कारण घनदाट शिवसेनेच्या मार्गावर होते. परंतु त्यांचा प्रवेश झालेला नाही. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांचे काम केले. यावरूनच घनदाट यांची कोणती खेळी आहे, हे समोर येते.

त्यामुळे डॉ. केंद्रेबरोबर घनदाट इच्छुकांच्या यादीमध्ये प्रभावी असतील. या ठिकाणी ‘रासप’चे नेते रत्नाकर गुट्टे सध्या कारागृहात असल्याने पेच आहे.

जिंतूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे इच्छुक आहेत. ही जागा शिवसेनेची असली तरी नुकतेच भाजपत गेलेले माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकरही इच्छुक आहेत. त्यांच्या कन्या मेघना साकोरे यांनी लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली होती. त्याची परतफेड आता पक्षाला करावी लागणार आहे. मग या ठिकाणी शिवसेनेचे इच्छुक राम पाटील यांचे काय होणार, हा प्रश्‍न आहे. पाटील यांनी लोकसभेत संजय जाधव यांचे तन, मन, धनाने काम केले होते. घनसावंगी मतदारसंघात शिवसेनेचे डॉ. हिकमत उढाण इच्छुक आहेत. त्यांचे संघटन तगडे आहे. राष्ट्रवादीकडून माजी राज्यमंत्री राजेश टोपे इच्छुक आहेत. 

परतूर मतदारसंघात मंत्री बबनराव लोणीकर (भाजप), कपील आकात (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि सुरेश जेथलिया (काँग्रेस) इच्छुक आहेत. परंतु चार पंचवार्षिकपासून या मतदारसंघात काँग्रेसला यश आले नाही. त्यामुळे या वेळी ही जागा राष्ट्रवादी मागू शकते, त्या दृष्टीनेच कपील अकात यांनी काम सुरू केलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com