
16 व्या विद्रोही मराठी साहित्य संम्मेलनाचे सरवरच उदघाटक, तर नागराज मंजुळे यांच्या हस्ते समारोप
- सचिन शिवशट्टे
उदगीर - १६ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन (Vidrohi marathi Sahitya Sammelan) उदगीर (Uadgir) येथे होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाने यंदा वेगवेगळ्या उपक्रमासह नाविण्यपूर्ण आयोजनाने लक्ष वेधून घेतले आहे. मराठवाड्याची स्थानिक संस्कृती, उदगीरचा इतिहास अशा अनेक गोष्टींना विद्रोही साहित्य संमेलनाने प्रतिनिधीत्व दिले आहे. यंदाच्या विद्रोही साहित्य संमेलनाने बहुभाषिकतेच्या संकल्पनेवर संमेलनाची आखणी केली आहे. मराठवाड्याच्या सुफी वारश्याचे महत्व लक्षात घेऊन विद्रोहीने ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्गाह अजमेरचे प्रमुख व सुफी विचारवंत सरवर चिश्ती (Sarwar Chishti) यांना उदघाटनासाठी आमंत्रित केले आहे. तर समारोपासाठी प्रसिध्द सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) हे येणार असल्याची माहिती संमेलनाचे कार्याध्यक्ष अरविंद पाटील यांनी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
संमेलनाच्या उदघाटनासाठी येणारे सरवर चिश्ती यांनी सुफी इतिहासावर संशोधनाला चालना दिली आहे. त्यांनी सुफी साहित्याच्या प्रसारासाठी देशभरात अनेक उपक्रम राबवले होते. इस्लामच्या सहिष्णू, प्रागतिक भूमिकेचा आग्रह धरुन त्यांनी सामाजिक सुधारणेची चळवळही राबवली आहे. सुफी कॉन्फरन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सरवर चिश्ती यांची कारकिर्द महत्वाची राहिली आहे. गुजरात, राजस्थान, दिल्ली येथी सुफी चळवळीला संघटीत करुन त्याला कार्यान्वीत करण्यातही त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. सरवर चिश्ती यांनी सुफी इतिहासाची साधने संकलित करुन त्याद्वारे सुफी इतिहासाची नवी समज विकसित करुन दिली आहे. वेगवेगळ्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने प्रागतिक राजकीय भूमिका मांडली आहे.
तर संमेलनाचे समारोप सत्राचे प्रमुख असणारे नागराज मंजुळे हे प्रख्यात सिनेदिग्दर्शक आहेत. त्यांनी सामान्य कलाकारांना चित्रपटक्षेत्राच्या मुख्य प्रवाहात आणून या क्षेत्रात एक विद्रोही व समतेची भूमिका घेतली आहे. त्यांच्या पिस्तुल्या या लघुपटाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे. फँड्री, सैराट, झुंड हे त्यांचे गाजलेले सिनेमे आहेत. तर उन्हाच्या कटाविरुध्द या त्यांच्या कविता संग्रहाला दमाणी साहित्य पुरस्कार, सहकारमहर्षी शंकरराव मोहीते पाटील साहित्य पुरस्कार मिळाला आहे. चित्रपटक्षेत्रात त्यांनी घेतलेल्या समतेच्या भूमिकेविषयी ऋणबंध म्हणून त्यांना या संमेलनाच्या समारोप सत्रात बोलावून त्यांचा सन्मान केला जात असल्याचेही अरविंद पाटील यांनी या पत्रकात नमूद केले आहे.
Web Title: Vidrohi Marathi Sahitya Sammelan Inaugural Sarwar Chishti And Send Up By Nagraj Manjule
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..