विलासरावांनी स्वत:ची टिमकी कधी वाजवली नाही

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

राज्याचे मुख्यमंत्री पद सांभाळताना विलासरावांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले; पण स्वत:ची टिमकी त्यांनी कधी वाजवली नाही. हे मी केलं असा गर्वही त्यांना कधी बाळगला नाही. कारण अहंकाराचा वारा त्यांना कधी लागलाच नाही. सत्तेची अभिलाषाही बाळगली नाही. ते खरे कर्मयोगी होते, अशा भावना विलासरावांचे जीवलग मित्र, माजी आमदार उल्हास पवार यांनी बुधवारी येथे व्यक्त केल्या. 

लातूर: राज्याचे मुख्यमंत्री पद सांभाळताना विलासरावांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले; पण स्वत:ची टिमकी त्यांनी कधी वाजवली नाही. हे मी केलं असा गर्वही त्यांना कधी बाळगला नाही. कारण अहंकाराचा वारा त्यांना कधी लागलाच नाही. सत्तेची अभिलाषाही बाळगली नाही. ते खरे कर्मयोगी होते, अशा भावना विलासरावांचे जीवलग मित्र, माजी आमदार उल्हास पवार यांनी बुधवारी येथे व्यक्त केल्या


दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकणाऱ्या ब्रीजलाल कदम-पाटील लिखित 'विलासपर्व' या ग्रंथाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पवार यांनी एखाद्याची फिरकी घेण्याची विलासरावांची सवय, त्यांच्यातील हजरजबाबीपणा, त्यांची वक्तृत्वशैली, विविध विषयांचा अभ्यास... असे वेगवेगळे पैलू आपल्या भाषणातून उलगडले. या वेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी खासदार गोपाळराव पाटील, माजी प्राचार्य सोमनाथ रोडे, आमदार त्र्यंबक भिसे, विनायकराव कदम-पाटील उपस्थित होते. 

पवार म्हणाले, विलासराव हे सतत लोकांमध्ये राहणारे नेते होते. त्यामुळे त्यांना कधी सकाळचा नाष्टा नीट करता आला नाही. तर कधी सकाळचे जेवण करता यायचे नाही. इतका त्यांचा लोकांमध्ये वावर असायचा. लोकांच्या दु:खाशी ते एकरूप व्हायचे. या सगळ्या व्यापात त्यांनी स्वत:च्या तब्येतीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांना आजाराशी सामना करावा लागला. ते असते तर आज मोठी जबाबदारी त्यांच्याकडे असते. 2005मध्ये आलेल्या पुरावेळी ते रात्रंदिवस जागे होते. स्वत: ते रस्त्यावर उतरले होते. मंत्र्यांना पुराच्या ठिकाणी पाठवले होते. जबरदस्त आकलन शक्ती, प्रशासनाला हाताळण्याची क्षमता होती. 

हातावर केली स्वाक्षरी 
रोडे म्हणाले, निवडणुकीत विलासरावांचाही एकदा पराभव झाला होता; पण ते खचले नाहीत. आपले कुठे चुकले, याचा अभ्यास करून त्यांनी गावोगाव पिंजून काढले. त्यानंतरच्या निवडणुकीत ते बहुमताने निवडून आले. पुढे मुख्यमंत्री झाले. एके दिवशी लातूरमधील एक सामान्य व्यक्ती त्यांना भेटण्यासाठी गेला होता. घाई-गडबडीतही विलासराव त्या व्यक्तीला भेटले. त्याने आपल्या अडचणी विलासरावांना सांगितल्या. तुमचे काम होईल, संबंधित मंत्र्यांना माझी स्वाक्षरी दाखवा, असे त्यांनी त्या व्यक्तीला सांगितले; पण जवळ कागद जवळ नव्हता. म्हणून विलासरावांनी त्या माणसाच्या हातावर स्वाक्षरी केली. ती पाहून संबंधीत मंत्र्यांनी त्यांचे रखडलेले काम लगेच केले. 

मी हिऱ्याभोवतीची चांदी 
विलासरावांचा आज सातवा स्मृतिदिन. खरंतर नेत्यांचे निधन झाल्यानंतर ते हळूहळू विस्मरणात जातात. त्यांच्याबाबतची ओढ कमी होत जाते; पण विलासरावांच्या बाबतीत उलटे होत आहे. त्यांचे चाहते वाढत आहेत. त्यांच्याबद्दलच्या अनेक आठवणी जागवल्या जात आहेत, असे सांगून दिलीपराव देशमुख म्हणाले, चिंधीत बांधलेल्या सोन्याला महत्व असते. चिंधीला नसते. हिरा जवळ असेल तर चांदीला काही महत्व नसते. ही चांदी किंवा चिंधी म्हणून भूमिका पार पाडण्याची जबाबदारी नियतीने माझ्यावर दिली. हे मी माझे भाग्य समजतो. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vilas parv book publication