देशमुखांचा कारखाना उठला गावकऱ्यांच्या जीवावर

कुणाल जाधव : सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 22 ऑगस्ट 2016

या प्रकरणी रेणा कारखान्याला प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नोटीस जारी केली आहे. सध्या गावाला आराजखेड्यावरून पाणीपुरवठा केला जात आहे. या गावातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी आश्वासन दिले आहे. त्यामुळे अद्याप कारवाई नाही.
- पांडुरंग पोले, जिल्हाधिकारी, लातूर

लातूर : माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे बंधू आणि कॉंग्रेसचे आमदार दिलीप देशमुख यांच्यामुळे मराठवाड्यातील एका गावावर मोठे संकट कोसळले आहे. देशमुखांच्या मालकीच्या लातूर जिल्ह्यातील "रेणा सहकारी साखर कारखान्या‘तून प्रक्रिया न करता सोडलेल्या सांडपाण्यामुळे बाजूला असलेल्या दर्जी बोरगाव नावाच्या गावातील नदी मोठ्या प्रमाणात दूषित झाली आहे. या नदीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी होत असल्याने गावातील तान्हुल्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत आजारी पडले आहेत.

लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्‍यात गेल्या अनेक वर्षांपासून रेणा सहकारी साखर कारखाना सुरू आहे. आमदार दिलीप देशमुख या कारखान्याचे संस्थापक आणि सर्वेसर्वा आहेत. या कारखान्याने आजूबाजूच्या गावकऱ्यांना काही प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिला आहे. मात्र, आता हाच कारखाना दर्जी बोरगावातील गावकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. मराठवाड्यातील इतर गावांप्रमाणेच दर्जी बोरगावातही पाण्याची समस्या गंभीर आहे. यावर तोडगा म्हणून गेल्या वर्षी लोकवर्गणीतून गावातून वाहणाऱ्या नदीचे खोलीकरण करण्यात आले. एका सामाजिक संस्थेच्या मदतीने गावकऱ्यांनी बारा लाखांचा निधी उभा करून नदीचे पुनरुज्जीवन केले. लोकांनी एकत्र येऊन केलेल्या या कामामुळे यंदाच्या पावसातही नदी भरून वाहून लागली. त्यामुळे गावातील बोअरवेलच्या पाण्यातही वाढ झाली. तीस जुलैला झालेल्या मुसळधार पावसाने ही नदी भरली आणि वर्षभराच्या पाण्याची गावकऱ्यांची चिंता मिटली. मात्र, गावकऱ्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात रेणा साखर कारखान्यातून कोणतीही प्रक्रिया ना केलेले घातक सांडपाणी नदीत सोडण्यात आले. यामुळे सुमारे पाच कोटी लिटर पाण्याचा हा साठा दूषित झाला. गावातील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करून हे पाणी न पिण्याच्या सूचना सरकारी दवाखान्यातून गावकऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मात्र, टॅंकरमधून येणाऱ्या अपुऱ्या पाण्यामुळे हे दूषित पाणी पिण्यावाचून दुसरा पर्याय गावकऱ्यांकडे नाही.

Web Title: Vilasrao Deshmukh, the factory got the villagers of life