उस्मानाबाद जिल्ह्यातील सरपंचपदाचे आरक्षण १८ डिसेंबरला

सयाजी शेळके
Wednesday, 9 December 2020

उस्मानाबाद  जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण शुक्रवारी (ता. १८) डिसेंबरला निश्चित होणार आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण शुक्रवारी (ता. १८) डिसेंबरला निश्चित होणार आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी बुधवारी (ता. नऊ) यासंदर्भातील आदेश काढले आहेत. त्यामुळे आता गावकारभाऱ्यांची चांगलीच पळापळ सुरू होणार आहे.जिल्ह्यात २०२० ते २०२५ या दरम्यान बहुतांश सर्वच ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या पदांचे आरक्षण आता निश्चित केले जाणार आहे. पुढील पाच वर्षे याच आरक्षणानुसार निवडणुका पार पडणार आहेत.

जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतीपैकी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासप्रवर्ग आणि खुला अशा वर्षांसाठी आरक्षण निश्चित केले जाते. उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी ही कार्यवाही पूर्ण करणार आहेत. संबंधित तहसील कार्यालयाचे तहसीलदार यांच्यासोबत असणार आहेत. जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीचे आरक्षण यावेळी निश्चित केले जाणार आहे.

उस्मानाबाद, उमरगा, कळंब आणि भूम या चार ठिकाणचे उपविभागीय अधिकारी संबंधित तालुक्याचे आरक्षण निश्चित करतील. तर तुळजापूरला जिल्हा पुरवठा अधिकारी, वाशीला उपजिल्हाधिकारी (रोहयो), परंड्याला उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) तर लोहारा येथील आरक्षण उपजिल्हाधिकारी (मध्यम प्रकल्प) यांच्यामार्फत होणार आहे. सकाळी ११ वाजता आरक्षणाच्या सोडतीस सुरुवात होणार आहे.

कारभाऱ्यांची धाकधूक वाढली
गावातील बहुतांश योजना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातात. दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा निधी ग्रामपंचायत स्तरावर दिला जातो. त्यामुळे ग्रामपंचायतींना चांगलेच महत्व प्राप्त झाले आहे. शिवाय सरपंचांची निवड थेट जनतेतून होणार नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या सदस्यांनाही यावेळी महत्व येणार आहे. पण, त्यापूर्वी सरपंच पदाचे आरक्षणही महत्वाचे असल्याने कारभाऱ्यांची धाकधूक वाढली आहे.
 

Edited - Ganesh Pitekar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Village Chief Reservation To Be Decide On 18 December Osamanabad News