
लातूर जिल्हा क्रीडा विभागामार्फत अनेक ठिकाणी खुल्या व्यायामशाळा (ओपन जीम) सुरु आहेत. या व्यायामशाळेचा फायदा नागरिकांना चांगल्याप्रकारे होत आहे.
लातूर : जिल्हा क्रीडा विभागामार्फत अनेक ठिकाणी खुल्या व्यायामशाळा (ओपन जीम) सुरु आहेत. या व्यायामशाळेचा फायदा नागरिकांना चांगल्याप्रकारे होत आहे. तरी जिल्ह्यातील सर्व पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावात खुले व्यायामशाळा सुरु करण्यासाठी क्रीडा विभागाने तात्काळ प्रस्ताव सादर करावेत. तसेच उदगीर व जळकोट तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी सर्व मंजूर असलेली व प्रलंबित राहिलेली कामे अधिक गतीने मार्गी लावातीत, असे निर्देश संसदीय कार्य राज्यमंत्री राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्ह्यातील व उदगीर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित कामांच्या आढावा बैठकीत श्री.बनसोडे बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल उपस्थित होते. उदगीर येथे सर्व सोयीसुविधा युक्त क्रीडा संकुल उभारणीचा बृहत आराखडा तात्काळ सादर करावा. या क्रीडा संकुलात बॅडमिंटन, धावपट्टी, फुटबॉल मैदानासह इतर सर्व क्रीडा विषयक सुविधा प्रस्तावित कराव्यात असे त्यांनी सूचित केले. तसेच उदगीर क्रीडा संकुलाची जी जागा आहे त्यास सर्व बाजूंनी संरक्षित भिंतीचे काम तात्काळ सुरु करावे. ८६ लाखांचा प्रस्ताव केला आहे. त्यासाठी निधी कमतरता असेल तर आमदार फंडातून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे श्री. बनसोडे यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागाने उदगीर येथे सर्व शासकीय कार्यालयांसाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रस्तावास पुढील १५ दिवसांत तांत्रिक मान्यता घ्यावी. ही इमारत भविष्यकालीन परिस्थितीचा विचार करुन अत्यंत प्रशस्त तयार केली पाहिजे असे सांगून यासाठी २५ कोटींचा निधी मंजूरी लवकरच मिळेल अशी ग्वाही त्यांनी दिली. उदगीर येथील ट्रॉमा केअर इमारतीची कामे, उदगीर शहरात उमा चौकात उड्डाणपुलासाठीचा प्रस्ताव, मार्केट यार्ड ते एम.जी. रस्ता, व मलकापूर उड्डाणपूलाचे प्रस्ताव सादर करावेत.
अकरावीच्या ऑनलाईन तासिका सुरु, प्रवेशाची प्रतिक्षा कायम
न्यायालयीन इमारत, निवासस्थाने व सभागृहाची कामे ही त्वरित मार्गी लावावीत. जळकोट येथील शासकीय विश्रामगृह, मुलींचे वसतिगृह व शासकीय रुग्णालयाची कामे वेळेत पूर्ण करावीत. उदगीर येथे नव्याने एमआयडीसी १०८ हेक्टर क्षेत्रावर प्रस्तावित करण्यात आली असून हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. तरी संबंधित यंत्रणेने पाठपुरावा करावा, असे निर्देश श्री.बनसोडे यांनी दिले.
संपादन - गणेश पिटेकर