‘हे’ गाव तसं चांगलं, पण समस्यांनी गांजलं

Nanded News
Nanded News

नांदेड :  सद्यःस्थितीत ग्रामीण भागाचा विकास हेच ध्येय केंद्र आणि राज्य सरकारच्या अजेंड्यावर आहे. परंतु, स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधींच्या हेव्यादाव्यामुळे बहुतांश गावे ही विकासापासून कोसो दूरच आहे. त्यापैकीच एक असलेले उंचाडा गाव. हे गाव अतिशय धार्मिक तसेच एकजुटीने राहणारे गाव म्हणून ओळखले जाते. मात्र, विकासापासून कोसोदूरच आहे.

रविवारी (ता.२४) एका धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने हदगाव तालुक्यातील उंचाडा गावात जाण्याचा योग आला. कयाधू नदीच्या काठावर हे उंचाडा गाव आहे. गावामध्ये जाण्यासाठी सिंगल डांबरी रस्ता असून जागोजागी खड्डे पडल्याने वाहनधारक त्रस्त झालेले आहेत. कयाधू नदीवर असलेल्या छोट्या पुलावरून गावामध्ये प्रवेश होतो. नदीला पाणी आल्यास गावाचा संपर्क पूर्णपणे तुटतो. खड्ड्यांतून वाट काढत उंचाडा गावात पोचलो. भागवत सप्ताहाचा समारोप असल्याने गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये संपूर्ण गाव सहभागी झाले होते. यावरून गाव कसे एकत्रित गुण्यागोविंदाने राहते याची प्रचिती आली. त्यामुळे गावातून फेरफटका मारण्याचा मोहर आवरला नाही. फेरफटका मारला असता, गावात चांगला रस्ता नाही, भूमिगत गटारी नाहीत, स्वच्छतागृहे असून नसल्यासारखी आहेत. स्वच्छतागृहे असताना शौच्यासाठी उघड्यावर बसण्याचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही. त्यामुळे गावाचा खऱ्या अर्थाने विकास करावयाचा असेल तर आता गावातील युवकांनीच पुढे यायला पाहिजे, अशा प्रतिक्रिया गावातील ज्येष्ठांनी ‘सकाळ’ शी बोलताना व्यक्त केल्या.

योजना राबवूनही विकास दूरच
राज्यातील विविध सामाजिक व विकासाशी निगडीत दैनंदिन जीवनातील समस्यांची (उदा. ग्रामीण योजनांतर्गत ग्राम स्वच्छता, शौचालये, सांडपाणी व्यवस्थापन, पेयजल, रस्ते विकास, रस्त्याचे मूल्यांकन करून मजबुतीकरण, जलसंधारण, इंधन व ऊर्जा, आरोग्य, दुष्काळ आदी.) उकल करून ते लोकाभिमूख करण्यावर शासनामार्फत भर दिला जात आहे. परंतु, या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याने योजना राबवूनही अनेक गावांचा विकास होताना दिसत नाही.

असा झाला मंदिराचा विकास
उंचाडा (ता. हदगाव) गावची लोकसंख्या सुमारे दोन हजार ५०० इतकी असून, प्रमुख व्यवसाय हा शेतीच आहे. मंदिरात स्वयंभू मूर्ती असल्याने जागृत देवस्थान म्हणून गावाची पंचक्रोशीत ओळख आहे. ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून १६ लाख रुपयांचा निधी जमा करून २०१६ मध्ये मंदिराची उभारणी केली. ग्रामस्थांच्या श्रमदानातूनच मंदिराचा पायथा ते कळसापर्यंतचे बांधकाम झालेले आहे. ग्रामस्थांमध्ये एकी रहावी, नव्या पिढीला गावाची संस्कृती कळावी या उद्देशाने ४१ वर्षांपासून सुरू असलेला सप्ताह आजही अखंडीत सुरूच असून, या धार्मिक कार्यक्रमाला सामाजिकतेची झालरही लावण्यात आली आहे. रक्तदान शिबिरासह प्रेरणादायी ठरलेल्या गावातील व्यक्ती व मुलांचाही गौरव करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केलेला आहे. मंदिरावरील कोरीव काम हे चेन्नई येथील कारागिरांनी केल्याची माहिती तुकाराम चव्हाण यांनी दिली.

मंदिराची अशी आहे अख्यायिका
पूर्वी गावात उंच वडाची झाडे होती. त्यामुळे उंचवड या नावाने गावाची ओळख होती. कालांतराने यात बदल होऊन उंचाडा या नावाने हे गाव ओळखू लागले आहे. या गावामध्ये पूर्वी झाडांचे प्रमाण जास्त असल्याने तुळजापूरची भवानी आणि माहूरची रेणुका या दोघीही या दंडकारण्यात नेहमी भेटायच्या. एकेदिवशी या दोघीजणी प्रभू रामचंद्रांना दंडकारण्यातून जात असताना दिसल्या. त्यांच्या दृष्टीच या दोघीजणी पडताच दोघीही अदृष्य झाल्या. ज्या ठिकाणाहून या दोघी गुप्त झाल्या, त्याच ठिकाणी देवींचे वास्तव्य आहे, असे पूर्वजांच्या सांगण्यावरून येथे श्री कालिंका देवीचे स्थान असल्याचे मानल्या गेले आहे. या ठिकाणी ग्रामस्थांनी ३५ फूट खोदकाम करत असताना पाणी लागलं. शिळा मात्र जशास तशा उभ्या होत्या. या स्वयंभू शिळा आजही या मंदिरात बघायला मिळतात.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com