
आई आणि वडीलांना गमावलेल्या भादा (ता.औसा) येथील दोन अनाथ मुलांना गावातीलच उपसरपंच बालाजी शिंदे यांनी मोठा आधार दिला आहे.
औसा(जि.लातूर) : आई आणि वडीलांना गमावलेल्या भादा (ता.औसा) येथील दोन अनाथ मुलांना गावातीलच उपसरपंच बालाजी शिंदे यांनी मोठा आधार दिला आहे. या दोन्ही मुलांच्या दैनंदिन गरजांसह त्यांच्या शिक्षणाचा आणि विवाहाचा खर्च ते उचलणार असल्याने या मुलांच्या जीवनात पसरलेल्या अंधारातून प्रकाशाचा कवडसा डोकावत आहे. ही दोन अनाथ मुले आता माझीच मुले आहेत, अशा भूमिकेतुन बालाजी शिंदे त्यांच्या भविष्याची आखणी करत असल्याने त्यांच्या या औदार्याचे कौतुक होत आहे. कठोर नियतीपुढेही भादेकरांची माणुसकी भारी ठरल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
सात वर्षांपूर्वी वडीलांना गमावलेल्या भादा येथील स्वाती आणि विशाल हजारे यांना नशिबाने ऐन दिवाळीत पुन्हा एकदा हादरा दिला. नरकचतुर्थी दिवशी आई सुवर्णा हजारे या त्यांच्या भावाच्या घरी बारशाच्या कार्यक्रमाला समुद्रवाणी येथे जात असताना टेम्पो पलटी होऊन त्या जागीच मरण पावल्या. वडीलानंतर आईच्या आधारावर जगणारी ही शाळकरी मुले पूर्ण उघड्यावर आली. काम केले तरच खायला मिळेल अशी स्थिती असताना आईच्या मोलमजुरीवर त्यांचा उदरनिर्वाह आणि शाळा होत होती. आता तीही सोडून गेल्याने या मुलांवर आभाळच कोसळले. त्यांच्या भविष्यासंदर्भात ‘सकाळ’ने नियती तुच सांग यात आमचा काय गुन्हा? या मथळ्याखाली या दोन मुलांची व्यथा जगासमोर आणली होती.
ही बातमी प्रकाशित होताच अनेकांनी या कुटुंबाशी संपर्क साधुन त्यांना आर्थिक व मुलांच्या शैक्षणीक कामात मदत करण्याच प्रयत्न केला. मात्र नुसती तुटपुंजी मदत व केवळ शिक्षणाचा भार उचलुन या मुलांचे भागणार नव्हते. मुलगी सतरा वर्षांची तर मुलगा पंधरा वर्षांचा असल्याने आई वडील दोघेही नाहीत म्हणुन मुलीचे लग्न लावून देण्याचे विचारही समोर येऊ लागले. त्यामुळे गावातील उपसरपंच बालाजी शिंदे यांनी या कुटुंबाशी संपर्क साधत त्या मुलीची इच्छा काय आहे हे पाहिले. तिला शिकायचे होते. पण पुढचे खर्च कसे करावे या विचाराने ती गप्प होती. बालाजी शिंदे यांनी तिला धिर देत तु पहिले शिक तुला कुठपर्यंत शिकायचे आहे ते मी तुला काहीही कमी पडू देणार नाही आणि तुझ्या भावालाही कमी पडू देणार नाही. नुसते शिक्षणच नाही तर तुमच्या दैनंदिन गरजांसह तुझे लग्नही थाटामाटात करुन देईन असा विश्वास दिल्याने स्वाती शिक्षणासाठी मामाच्या गावाला गेली.
स्वतःवर दुःखाचा डोंगर कोसळला असतांनाही दिला अनाथांना आधार
गेल्या महिन्यातच बालाजी शिंदे यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यांना मुलबाळ नाही. पत्नीही सोडून गेली असतांना स्वतःच्या दुःखाला गोंजरत बसण्यापेक्षा या दोन अनाथ मुलांचा पालक बनण्याची संधी परमेश्वरांने दिली. त्यांनी या मुलांची संपूर्ण जबाबदारी ते हयात असेपर्यंत घेण्याचे ठरविले आणि नियतीने अंधारात ढकलेल्या अनाथांच्या जीवनात पहाट उगवली. या मुलांमध्येच मी माझी मुले पाहणार असल्याचे त्यांनी सांगत या मुलांना कधीही आईबाबांची कमतरता भासु देणार नसल्याचे त्यांनी सकाळशी बोलतांना सांगितले. त्यांच्या या औदार्याची चर्चा तालुकाभर असुन त्यांचे कौतुकही होत आहे.
संपादन - गणेश पिटेकर