जिंकण्यासाठी आवश्‍यक ते करू, घोडेबाजारावर विनोद घोसाळकर यांचा उतारा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

जालना-औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीतील महायुती व महाआघाडीच्या उमेदवारांनी एकत्र येत घोडेबाजार रोखण्याचे गुरुवारी (ता. आठ) आवाहन केले होते. त्यांच्या या वेगळ्या खेळीची चर्चा सुरू असतानाच शुक्रवारी (ता. नऊ) शिवसेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी निवडणूक जिंकण्यासाठी पक्ष म्हणून आवश्‍यक ते आम्ही करू, असे सांगत घोडेबाजार होणार, असे प्रत्यक्षरीत्या जाहीर केले. https://www.esakal.com/marathwada/news-about-legislative-council-election-205935

औरंगाबाद - जालना-औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीतील महायुती व महाआघाडीच्या उमेदवारांनी एकत्र येत घोडेबाजार रोखण्याचे गुरुवारी (ता. आठ) आवाहन केले होते. त्यांच्या या वेगळ्या खेळीची चर्चा सुरू असतानाच शुक्रवारी (ता. नऊ) शिवसेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी निवडणूक जिंकण्यासाठी पक्ष म्हणून आवश्‍यक ते आम्ही करू, असे सांगत घोडेबाजार होणार, असे प्रत्यक्षरीत्या जाहीर केले. 

जालना-औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात शिवसेनेचे अंबादास दानवे व कॉंग्रेसचे बाबूराव कुलकर्णी यांच्यात थेट लढत होणार आहे. या दोघांनी शिवसेनेचे राजू वैद्य यांच्या निवासस्थानी गुरुवारी एकत्र येत निवडणुकीतील घोडेबाजार रोखण्याचे जाहीर आवाहन केले. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच प्रतिस्पर्धी उमेदवारांनी एकत्र येत नवी खेळी खेळली. त्यामुळे अनेकांच्या आशांवर पाणी फेरले. याबाबत शुक्रवारी शिवसेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर म्हणाले, ""या निवडणुकीतील घोडेबाजार सर्वश्रुत आहे; मात्र दोन्हीही उमेदवारांनी एकत्र येत सुसंस्कृतपणा दाखविला. निवडणूक जिंकण्यासाठी जे करायचे आहे ते आम्ही करणारच'', असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, महापौर दालनात राज्यमंत्री
अतुल सावे, महापालिका पदाधिकाऱ्यांसह उमेदवार अंबादास दानवे, शिवसेना-भाजप नेत्यांच्या उपस्थितीत युतीच्या नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. 

'एमआयएमची मदत नाकारणार नाही' 
निवडणुकीत प्रत्येक मत महत्त्वाचे असते. आमच्याकडे आवश्‍यक मतदान असले, तरी एमआयएम पक्ष मदत करणार असेल तर ती नाकारली जाणार नाही; पण अद्याप एमआयएम पक्षाकडून तसा प्रस्ताव आलेला नाही, असे घोसाळकर म्हणाले. 
 
'शंभर मतांनी जिंकणार' 
भाजपचे नेते डॉ. भागवत कराड म्हणाले, "शिवसेना-भाजप निवडणुकीत सोबत असून, आमच्याकडे 333 मतदार आहेत. निवडून येण्यास 328 मते आवश्‍यक आहेत. आमचा उमेदवार 100 पेक्षा अधिक मतांनी निवडून येईल,'' असा दावा कराड यांनी केला. 

संबंधित बातमी -

घोडेबाजाराविरोधात प्रतिस्पर्धी दानवे-कुलकर्णी एकत्र
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vinod Ghosalkar's reaction on legislative assembly election