‘व्हीआयपी रोड’चा श्‍वास गुदमरला

औरंगाबाद - शहागंज ते जिल्हाधिकारी कार्यालय जोडणारा व्हीआयपी रोड रिक्षा आणि हातगाड्यांनी वेढलेला आहे.
औरंगाबाद - शहागंज ते जिल्हाधिकारी कार्यालय जोडणारा व्हीआयपी रोड रिक्षा आणि हातगाड्यांनी वेढलेला आहे.

हातगाड्या, रिक्षांच्या विळख्यामुळे व्यापारी त्रस्त; पोलिसांचे दुर्लक्ष

औरंगाबाद - शहागंजपासून जिल्हाधिकारी कार्यालय आणि विभागीय आयुक्‍तालयाला जोडणारा रस्ता म्हणजे व्हीआयपी रोड. असंख्य आंदोलने व मोर्चांचा साक्षीदार असलेल्या या रस्त्याचा सध्या हातगाड्या आणि रिक्षांमुळे श्‍वास घुटमळला आहे. या रस्त्यावरील वाहतूक शिस्तबद्ध करण्याची मागणी वारंवार परिसरातील नागरिक आणि चेलीपुरा व्यापारी संघटनेने महापालिका, पोलिस प्रशासन, नगरसेवक आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे केली. मात्र, जुजबी कारवाई होते व दुसऱ्या दिवसापासून ‘जैसे थे’ परिस्थिती होते.

जुने शहर ते जिल्हाधिकारी कार्यालय जोडणारा दुवा म्हणजे अर्धा किलोमीटरचा व्हीआयपी रस्ता. चेलीपुरा बाजारपेठेतून जाणाऱ्या या मार्गावर साडेचारशे ते पाचशे ठोक व किरकोळ व्यावसायिक आहेत. प्रामुख्याने किराणा, प्लास्टिक, चायना मार्केट, शू-चप्पल, चहापत्ती, भाजीमंडई आणि खाद्यतेल व्यावसायिकांचा समावेश आहे. या ठिकाणी औरंगाबादसह अन्य जिल्ह्यांतील ग्राहकही खरेदीसाठी येतात. अडीच ते तीन वर्षांपूर्वी व्यापाऱ्यांच्या सहकार्याने या रस्त्याचे रुंदीकरणही झाले. 

तीस फुटांचा रस्ता ५० फुटांचा झाल्याने व्यवसायवृद्धीही होण्याची अपेक्षा व्यापाऱ्यांना होती. मात्र, घडले उलटेच. तीसफुटी रस्ता असताना चारचाकी वाहने घेऊन ग्राहक खरेदी करू शकत होता. मात्र, आता ५० फुटांच्या या रस्त्याला हातगाड्या आणि रिक्षावाल्यांचा विळखा पडला आहे. या परिसरात शहागंज आणि चेलीपुऱ्यात अधिकृत रिक्षा स्टॅंड असूनसुद्धा व्हीआयपी रोडवर दुतर्फा रिक्षांच्या रांगा लागतात. त्याचा नाहक त्रास ग्राहक आणि व्यापाऱ्यांना सोसावा लागतो. त्यामुळे व्यवसायात तीस टक्‍क्‍यांपर्यंत घट झाली. याबद्दल महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनदेखील उपयोग झाला नाही, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. 

व्हीआयपी रोडवर मुजोरी करून उभ्या राहणाऱ्या रिक्षांवर कडक कारवाई करायला हवी. त्याशिवाय ‘नो हॉकर्स झोन’ची अंमलबजावणी करून रस्त्याचा श्‍वास मोकळा करावा. ज्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांना सुटकेचा श्‍वास घेता येईल. 
- कचरू वेळंजकर, अध्यक्ष, चेलीपुरा व्यापारी संघटना.

शासकीय रुग्णालय व महाविद्यायातर्फे चालविले जाणारे दुर्गाप्रसाद आरोग्यधाम येथे अत्यल्प दराने आरोग्य सुविधा पुरविली जाते. मात्र, अतिक्रमण आणि अनधिकृतपणे उभ्या राहणाऱ्या रिक्षांमुळे रुग्ण येण्याचे टाळतात. त्याशिवाय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही याचा त्रास होतो; मात्र त्यावर ठोस कारवाई होत नाही. 
- मोहिंदर बाखरिया, नागरिक

पार्किंग, स्वच्छतागृहाची मागणी
हजारो नागरिक आणि वाहनांची वर्दळ असलेल्या शहागंज आणि चेलीपुरा येथे स्वच्छतागृह आणि पार्किंगची सुविधा नाही. त्यामुळे वाहने जागा मिळेल तेथे उभी केली जातात. या ठिकाणी दोन पोलिस चौक्‍या आहेत; मात्र पोलिससुद्धा दुर्लक्ष करतात. त्यामुळे तासन्‌तास वाहतुकीचा खोळंबा ठरलेलाच आहे. या ठिकाणी स्वच्छतागृहाचीही मागणी कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. शहागंज, चेलीपुरा आणि राजाबाजार परिसरात सुरक्षेच्या कारणास्तव पाच ते सहा सीसीटीव्ही बसविण्यात आले होते. हे सीसीटीव्हीही कार्यान्वित नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com