होय, औरंगाबादेतही भरू शकते आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रदर्शनी!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जानेवारी 2017

औरंगाबाद - यंदाचे ऍडव्हान्टेज महाराष्ट्र एक्‍स्पो बघता औरंगाबादेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन भरविले जाऊ शकते, हे एकप्रकारे सिद्ध झाल्याचे मत बहुतांश प्रमुख पाहुण्यांनी समारोपाच्या कार्यक्रमात व्यक्त केले. पुढील प्रदर्शन हे 2020 मध्ये होणार असले, तरी यापुढे दर दोन वर्षांनी असे प्रदर्शन भरविले गेले पाहिजे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. 

औरंगाबाद - यंदाचे ऍडव्हान्टेज महाराष्ट्र एक्‍स्पो बघता औरंगाबादेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन भरविले जाऊ शकते, हे एकप्रकारे सिद्ध झाल्याचे मत बहुतांश प्रमुख पाहुण्यांनी समारोपाच्या कार्यक्रमात व्यक्त केले. पुढील प्रदर्शन हे 2020 मध्ये होणार असले, तरी यापुढे दर दोन वर्षांनी असे प्रदर्शन भरविले गेले पाहिजे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. 

"मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ऍण्ड ऍग्रिकल्चर'तर्फे आयोजित ऍडव्हान्टेज महाराष्ट्र एक्‍स्पोचा रविवारी (ता. आठ) समारोप झाला. समारोपाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष व उद्योजक राम भोगले व मानसिंग पवार, एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक अण्णासाहेब शिंदे, सुभाष जाधव उपस्थित होते. या वेळी मसिआचे अध्यक्ष विजय लेकुरवाळे, प्रदर्शनाचे समन्वयक भारत मोतिंगे व संतोष कुलकर्णी, सुनील किर्दक, अभय हंचनाळ, नारायण पवार यांची उपस्थिती होती. 

""2002 पासून दर तीन वर्षांनी प्रदर्शन भरविले जाते. यापुढील प्रदर्शन हे 2020 मध्ये भरविले जाईल. त्याची तयारी आतापासूनच आम्ही करणार आहोत.'' अशी माहिती श्री. लेकुरवाळे यांनी दिली. तर श्री. मोतिंगे यांनी साठ हजारांवर नागरिकांनी भेट दिल्याचे सांगितले. 

"पहिल्या प्रदर्शपासून ते आताच्या प्रदर्शनापर्यंतचा प्रवास बघितला तर अनेक नवीन उद्योजकांची भर पडल्याचे दिसते. उद्योजकांना प्रेरणा देणारे हे प्रदर्शन होते. शेंद्रातील कन्व्हेन्शन सेंटर 50 एकरांवरच कसे उभारले जाईल यासाठी प्रयत्न करू,' अशी ग्वाही श्री. बागडे यांनी दिली. "आगामी काळात शेती उद्योगांवर भर देणारे कारखाने उभारले जावेत. नवीन उद्योजक तयार व्हावेत याकरिता सरकारने कर सवलती दिल्या पाहिजेत. भूखंड घेण्यास पुरेसे पैसे नसतील तर टप्प्याटप्प्याने भरायची सुविधा उपलब्ध करून द्यावी,' अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

आमदार सावे यांनी दर दोन वर्षांनी प्रदर्शन भरविले जावे, अशी अपेक्षा व्यक्त करताना आगामी काळात कलाग्राममध्ये प्रदर्शन भरविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली. "1992 मध्ये पहिले प्रदर्शन भरले. तेव्हापासून आतापर्यंत औरंगाबादचे उद्योग क्षेत्र मोठ्या प्रमाणावर बदलले. तो बदल या प्रदर्शनातून पाहायला मिळाला. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनांमध्ये उद्योजकांनी सहभागी व्हावेस' असे श्री. भोगले म्हणाले. तर श्री. पवार यांनी दिल्ली येथील प्रगती मैदानाप्रमाणेच येथेही कायमस्वरूपी प्रदर्शनी केंद्र असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

Web Title: The visitors of the Expo concluded expressed confidence Advantage Maharashtra