
‘विवेकानंद’च्या पथकाने वाचवले तीन वारकऱ्यांचे प्राण
लातूर - आषाढी वारीनिमित्त पायी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी येथील विवेकानंद रुग्णालयाच्या वतीने पाठविण्यात आलेल्या वैद्यकीय पथकाने तीन अत्यवस्थ रुग्णांचे प्राण वाचवले. या पथकाने १० हजाराहून अधिक वारकऱ्यांवर मोफत उपचार केले, अशी माहिती दिंडी प्रमुख शाम बरुरे यांनी दिली.
मागील १८ वर्षांपासून विवेकानंद रुग्णालय आषाढी वारी मधील वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी वैद्यकीय पथक पाठवत आहे. यावर्षीही ता.३० जून रोजी विवेकानंद रुग्णालयाचे पथक रवाना झाले होते. या पथकामध्ये डॉ. आकाश हौशट्टे यांच्यासह चंद्रकांत आरडले, राजाभाऊ साळुंके, गोविंद सावंत, सहदेव गावकरे, संगमेश्वर बरुरे, प्रताप चव्हाण, विष्णू पंडगे या परिचारकांचा समावेश होता. आषाढी वारी करून परतल्यानंतर गुरुवारी (ता. २१) सायंकाळी अनुभव कथन आणि स्वागताचा कार्यक्रम येथे झाला. यावेळी बरुरे यांनी ही माहिती दिली. या कार्यक्रमास डॉ.अशोक कुकडे, डॉ. गोपीकिशन भराडिया, संस्थेचे अध्यक्ष अनिल अंधोरीकर, डॉ. दिलीप देशपांडे, संस्थेचे कार्यवाह डॉ. राधेश्याम कुलकर्णी उपस्थितीत होते.
शाम बरुरे यांनी सांगितले की, वारीतील वारकरी `विवेकानंद`च्या पथकाला आपला दवाखाना असे संबोधतात. यंदाच्या वारीत तीन रुग्ण अत्यवस्थ झाले होते. विवेकानंद रुग्णालयाच्या पथकाने त्यांच्यावर उपचार केले. ते सर्व रुग्ण ठणठणीत बरे झाले. नंतर ते रुग्ण डॉक्टरांचा सत्कार करून आभार मानण्यासाठी आले होते. परंतु तोपर्यंत विवेकानंदचे पथक पंढरपूर येथे पोहोचले होते. पथकाकडून मोफत उपचार केले जातात परंतु त्याचा कुठेही उल्लेख आढळत नाही. भविष्यात मोफत उपचार असा उल्लेख करायला हवा. या पथकात महिला परिचारकांचाही समावेश हवा, अशी सूचना त्यांनी केली.
वारीतील अनुभव सांगताना डॉ. आकाश अवशेट्टे यांनी वाखरी येथे एक महिला अत्यवस्थ झाल्याचे सांगितले. ती महिला बेशुद्ध होती. नाडी देखील लागत नव्हती. अशा स्थितीत तिच्यावर उपचार केले. उपचारानंतर ती महिला पुन्हा एकदा चालत वारीत सहभागी झाल्याचे ते म्हणाले. अनेक ठिकाणी वारकऱ्यांना झाडाखालीच सलाईन लावत उपचार केले. रुग्णवाहिकेजवळ, रस्त्याच्या कडेला जेथे जागा मिळेल तिथे उपचार करण्यात येत होते. दिवस-रात्र याचा विचार न करता केलेल्या या उपचारातून समाधान मिळाल्याचेही ते म्हणाले.
Web Title: Vivekanandas Team Saved The Lives Of Three Warkaris
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..