अर्धा मराठवाडा भाजपचा, शिवसेनेची मदत लागणार

BJP
BJP

औरंगाबाद - शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यात भाजपने जोरदार धडक देत आपली ताकद दाखवून दिली आहे. कॉंग्रेसचा गड समजल्या जाणाऱ्या लातूर जिल्हा परिषदेत स्पष्ट बहुमत मिळवत भाजपने हा जिल्हा कॉंग्रेसमुक्त केला आहे. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आमदार अमित देशमुख यांच्यासह दिलीपराव, शिवराज पाटील चाकूर यांच्यासह कॉंग्रेसच्या मातब्बर नेत्यांवर मात करत आपले नाणे खणखणीत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

लातूर प्रमाणेच औरंगाबाद, जालना व हिंगोली जिल्हा परिषदेत देखील भाजपने जोरदार एन्ट्री केली आहे. या तिन्ही ठिकाणी मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेल्या शिवसेनेला भाजपने बॅकफूटवर टाकले आहे. मराठवाड्यातील लातूर जिल्हा परिषदेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी जालना, औरंगाबाद व हिंगोलीमध्ये सत्ता स्थापनेसाठी त्यांना आधार घ्यावा लागणार आहे. युती तुटल्यानंतर वैचारिक मतभेद नसलेल्या शिवसेनेला भाजप जवळ करते की अन्य पर्यायांचा स्वीकार करते हे लवकरच स्पष्ट होईल. भाजप-सेनेने अर्धा मराठवाडा काबीज केला असला तरी नांदेड, परभणी, बीड आणि उस्मानाबादेत कॉंग्रेस- राष्ट्रवादीने सत्ता कायम राखली आहे. 

युती तुटल्यानंतर स्वतंत्र लढलेल्या शिवसेना-भाजपला मराठवाड्यात फायदा झाला. तर लातूरमध्ये आघाडी करुन देखील कॉंग्रेसला सत्ता राखता आला नाही. 2012 मध्ये मराठवाड्यातील जालना, हिंगोली वगळता सहा जिल्हा परिषदेमध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती. 2017 मध्ये लातूर आणि औरंगाबाद जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत. भाजपने प्रचारात आघाडी घेत विकासाचा मुद्दा रेटला होता. मतदारांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे जाहीर झालेल्या निकालावरून स्पष्ट होते. नोटाबंदी, शेतीमालाचे पडलेले भाव, मराठा आरक्षण आदी मुद्दे सत्ताधारी भाजपला अडचणीचे ठरू शकतील असा अंदाज बांधण्यात आला होता, मात्र तो सपशेल चुकला. ग्रामीण भागातील मतदारांनी भरभरुन भाजप-शिवसेनेच्या पारड्यात मतांचे दान टाकले. 

निलंगेकर, दानवे, लोणीकर पास, पंकजा फेल 
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपापल्या जिल्ह्यात चमकदार कामगिरी करत भाजपला घवघवीत यश मिळवून दिले. महिला व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना मात्र नगरपालिकेप्रमाणेच याही वेळी पराभव पत्करावा लागला. परळी या मतदार संघात दुसऱ्यांदा बंधू धनंजय यांच्याकडून पंकजा यांना नामुष्की सहन करावी लागली. दानवे, लोणीकर यांनी मुलगा व मुलगी या दोघांना तर निवडून आणलेच पण जिल्ह्यात 22 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा बहुमान देखील पटकावला. 

अशोक चव्हाणांनी गड राखला 
लोकसभा, विधानसभेच्या वेळी आलेल्या मोदी लाटेत देखील आपला गड कायम राखण्यात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना यश आले होते. पुढे नगरपालिका निवडणुकीत देखील चव्हाणांनी आपला करिष्मा कायम राखला होता. जिल्हा परिषदेच्या निमित्ताने चव्हाणांचे जिल्ह्यावरील निर्विवाद वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले आहे. सत्तेसह कॉंग्रेसच्या जागा नांदेड जिल्ह्यात वाढवण्यात त्यांना यश आले आहे. कॉंग्रेसने जिल्हा परिषदेतील सत्ता कायम राखली असली तरी खतगावकरांच्या भाजप प्रवेशामुळे जिल्ह्यात कमळ उमलायला सुरुवात झाली आहे. 2012 मध्ये भाजपला जिल्हा परिषदेत केवळ चार जागा होत्या, यावेळी ती संख्या 9 ने वाढून 13 वर गेली आहे. याचा कॉंग्रेसला कुठे तरी विचार करावा लागणार आहे. राष्ट्रवादीला मात्र या निवडणुकीत 8 जागांचा फटका बसला आहे. 

परभणी, उस्मानाबादेत घड्याळ 
नांदेड प्रमाणेच राष्ट्रवादीने परभणी जिल्हा परिषदेची सत्ता राखली आहे. पण त्यांना गेल्यावेळच्या तुलनेत एका तर कॉंग्रेसला 3 जागांचा फटका बसला आहे. शिवसेनेला 2 आणि भाजपला एका जागेचा फायदा झाला आहे. उस्मानाबादेत राष्ट्रवादीने कॉंग्रेसची सत्ता उलथवून जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवला आहे. शिवसेनेशी छुपी युती करुन राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवण्याचा कॉंग्रेसचा डाव यावेळी मात्र फसला आहे. राष्ट्रवादीला 26 जागांवर विजय मिळाला असून ते बहुमताच्या जवळ पोहचले आहेत. गेल्यावेळच्या 20 जागांमध्ये यंदा राष्ट्रवादीने 6 जागांची भर घालत सत्ता खेचून आणली आहे. कॉंग्रेसला आपले संख्याबळ राखता आले नाही. गेल्या निवडणुकीतील 20 वरुन त्यांची घसरण 13 वर झाली आहे. अंतर्गत गटबाजी आणि नेतृत्वाची गर्दी यातही शिवसेनेने जिल्ह्यातील बहुतांश जागा राखल्या आहेत, त्यांना एका जागेचे नुकसान सहन करावे लागले. भाजपला मात्र दोन जागा अधिक मिळाल्यामुळे त्यांची संख्या चार झाली आहे. 

राजीनामा देणार 
नगरपालिके पाठोपाठ जिल्हा परिषदेत देखील दारुण पराभव स्वीकारावा लागल्याने याची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपण मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे देणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले. 

मराठवाड्यातील जिल्हानिहाय पक्षीय बलाबल 
औरंगाबाद (62 गट) 
भाजप- 23 
शिवसेना-18 
कॉंग्रेस-16 
राष्ट्रवादी-3 
मनसे-1 
अपक्ष-1 
--------------- 
जालना- (56 गट) 
शिवसेना-14 
भाजप-22 
राष्ट्रवादी-13 
इतर- 02 
------------------ 
बीड- (60 गट) 
शिवसेना-4 
भाजप-19 
कॉंग्रेस-3 
राष्ट्रवादी-25 
इतर-9 
-------------------- 
परभणी- (54 गट) 
शिवसेना-13 
भाजप-3 
कॉंग्रेस-5 
राष्ट्रवादी-24 
इतर-6 
----------------- 
हिंगोली- (52 गट) 
शिवसेना-15 
भाजप-10 
कॉंग्रेस-12 
राष्ट्रवादी-12 
इतर- 03 
--------------------- 
नांदेड- (63 गट) 
शिवसेना-10 
भाजप-13 
कॉंग्रेस-28 
राष्ट्रवादी-10 
इतर-02 
------------------------ 
लातूर- (58 गट) 
शिवसेना-1 
भाजप-36 
कॉंग्रेस-15 
राष्ट्रवादी-5 
इतर- 01 
------------------------- 
उस्मानाबाद- (55 गट) 
शिवसेना-11 
भाजप- 04 
कॉंग्रेस- 13 
राष्ट्रवादी-26 
इतर- 01 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com