आई, तू मतदान करायला जा नं...

Haribhau-Patil
Haribhau-Patil

पूर्णा - ‘नाळ’ चित्रपटातील ‘आई मला खेळायला जायचं, जाऊ देनं वं’ या गाण्यावर सोशल मीडियावर वेगवेगळे प्रयोग सुरू असताना विद्यार्थ्यांनी मात्र त्याचा मतदारांना साद घालण्यासाठी खुबीने वापर केला आहे. ‘आई, तू मतदानाला जा नं, मी तुझी सगळी कामे करीन’ असे भावनिक आवाहन आई-बाबांना पत्रातून करून या विद्यार्थ्यांनी जागृतीचा कौतुकास्पद प्रयत्न केलाय.

येथील विद्या प्रसारिणी सभेच्या प्राथमिक शाळेत राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त अभिनव उपक्रम राबविण्यात आला. आई-बाबा, तुम्ही आमच्या भविष्याची काळजी करता ना, मग मतदानाला जा. आमिष, प्रलोभनांना बळी न पडता सशक्त लोकशाही व राष्ट्रहितासाठी मतदानाचा पवित्र हक्क बजावा, हा या उपक्रमाचा गाभा होता. 

समाजसेवक व संस्थाध्यक्ष डॉ. दत्तात्रय वाघमारे, मुख्याध्यापक डॉ. हरिभाऊ पाटील यांनी विद्यार्थ्यांना आई-बाबांना या विषयावर पत्र लिहावयास सांगून ते संबंधितांच्या घरच्या पत्त्यावर पाठवायचे ठरविले. या उपक्रमांत शेकडो विद्यार्थी सहभागी झाले. काही विद्यार्थ्यांनी ‘नाळ’मधील गाण्याचा आशय पकडून मतदानाचे महत्त्व सांगितले.   

‘तुम्ही आमची काळजी करता ना, तशी देशाचीही करा. लोकशाही टिकली तरच आमचे भले होईल. दानाचे पावित्र्य जपत मतदान करा. जात, धर्म, आपला, परका, दूरचा असा विचार न करता योग्य व समाजहित, राष्ट्रहिताचे काम करू शकणाऱ्या प्रामाणिक उमेदवारांना मतदान करा. इतरांनाही सांगा,’ अशी साद चिमुकल्यांनी आपल्या पालकांना घातली. आम्हाला लोकशाहीची मधुर फळे चाखू द्या, असा आर्त भाव व्यक्त करीत माझ्या भविष्याची चिंता वाहा. मी प्रामाणिकपणे, सदसद्विवेकबुद्धीने मतदान केले, हे अभिमानाने सांगा, असा आग्रहही पत्रातून मुलांनी केला आहे. आदित्य शृंगारपुतळे, आदर्श साळवे यांनी तर देशासाठी प्राणार्पण करणाऱ्यांच्या त्यागाची व बलिदानाची आठवण पत्रातून करून दिली. ‘मी तुझी सगळी कामे करतो, पण तू मतदानाला जा’ अशी ‘नाळ’मधील गाण्याचा संदर्भ जोडत प्रसाद मोरे पत्र लिहितो तेव्हा या चिमुकल्यांच्या प्रगल्भतेची कल्पना येते. हर्षदा इप्पर, प्रियांका लुंगारे, निर्मिती बगाटे, सृष्टी घाटोळ, शुभम डुकरे, पौर्णिमा गायकवाड, प्रतीक्षा केसे, वैभवी कोठारे यांनी पत्रांतून आमच्या उद्याच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी व भविष्यासाठी मतदानाला जाच, असा हट्ट धरला आहे. माझ्या एकट्याच्या मतदानाने काय फरक पडणार आहे, ही बाबही त्यांनी उदाहरणे देत खोडून काढली. शेतकऱ्यांच्या व्यथा व वेदना तसेच मोफत शिक्षण याबाबत अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. आस्था रेड्डी हिने विद्यार्थ्यांना मोफत दर्जेदार शिक्षण व हाताला काम देणाऱ्यांना मतदान करण्याची विनंती केली आहे. पैसे व अन्य प्रलोभनेच प्रगतीचा घात करतात, हे मानसी इंगोलेने अधोरेखित केले. 

तहसीलदार श्‍याम मदनूरकर व त्यांच्या साथीदारांनी या उपक्रमासाठी प्रेरणा दिली. मुख्याध्यापक डॉ. हरिभाऊ पाटील यांच्या या पत्र कल्पनेला शिवदर्शन हिंगणे, गोविंद चाटे, पंजाब आहेर, गंगाधर मोरे, शिवप्रसाद ठाकूर, काशीनाथ सलोने आदी शिक्षकांनी साथ दिली.

विद्यार्थ्यांना संस्कारशील शिक्षण मिळाले पाहिजे. त्यांच्यात सामाजिक, राष्ट्रीय जबाबदारीचे भान निर्माण होणे आवश्‍यक आहे. या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांनीच पालकांना साद घालावी म्हणून हा उपक्रम राबविला. 
- डॉ. हरिभाऊ पाटील, मुख्याध्यापक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com