मराठवाड्याला स्वयंचलित हवामान केंद्राची प्रतीक्षाच

सुषेन जाधव
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

निम्मा पावसाळा सरला तरी अद्यापही औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचे स्वयंचलित हवामान केंद्राचे स्वप्न पूर्ण झालेले नाही. मराठवाड्यातील आठपैकी केवळ या दोन जिल्ह्यांसाठी मंजुरी मिळालेली असताना हे हवामान केंद्र न झाल्याने शेतकऱ्यांना मिळणारे हवामान अंदाज आणि केंद्रात कार्यरत चार हातांना मिळणारा रोजगार केवळ नावालाच राहिला आहे. केंद्र सुरू होण्यासाठी अजून तीन महिने लागणार असल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत. 

औरंगाबाद - निम्मा पावसाळा सरला तरी अद्यापही औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचे स्वयंचलित हवामान केंद्राचे स्वप्न पूर्ण झालेले नाही. मराठवाड्यातील आठपैकी केवळ या दोन जिल्ह्यांसाठी मंजुरी मिळालेली असताना हे हवामान केंद्र न झाल्याने शेतकऱ्यांना मिळणारे हवामान अंदाज आणि केंद्रात कार्यरत चार हातांना मिळणारा रोजगार केवळ नावालाच राहिला आहे. केंद्र सुरू होण्यासाठी अजून तीन महिने लागणार असल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत. 

अगोदरच हवामान विभागाने दिलेल्या पावसाच्या अंदाजावर मराठवाड्यातून टीकेची झोड उठत आहे. हवामान विभागाने आपल्या अखत्यारीत असलेले हवामान केंद्र सुरू करण्याच्या बाबतीतही तोच खोडसाळपणा केल्याचे समोर आले आहे. भारतीय हवामान विभाग (आयएमडी) आणि पुण्यातील 'अटारी'अंतर्गत राज्यातील दहा जिल्ह्यांच्या कृषी विज्ञान केंद्रात स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्यात येणार होते. पर्जन्यमान, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आदी माहिती सॅटेलाईटद्वारे केव्हीकेकडे आणि केव्हीकेतून थेट शेतकऱ्यांपर्यंत देण्यात येणार होती. यासाठी मराठवाड्यातील औरंगाबाद व तुळजापूर (जि. उस्मानाबाद) येथील केव्हीकेची निवड करण्यात आली होती. त्यासाठी महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात राज्यांतील 21 नोडल
ऑफिसर यांना जुलै 2018 मध्ये प्रशिक्षणही देण्यात आले होते. 
  
नोकरी मिळाली; पण रुजू कधी करून घेणार? 
या हवामान केंद्रात संदेशवाहक (एसएमएस) आणि ऍग्रोमेट ऑब्झर्व्हर अशा दोन पदांची भरती करण्याचे आदेश आयएमडीने कृषी विद्यापीठाला दिले होते. आजवर रखडलेल्या मुलाखती कृषी विद्यापीठाने नुकत्याच घेतल्या असून, दोन जिल्ह्यांच्या केव्हीकेसाठी निवड झालेल्यांना चार उमेदवारांना नियुक्तिपत्रही देण्यात आले आहे. त्यांना नोकरी मिळाली; पण रुजू कधी करून घेणार, असा सवाल निवड झालेल्या उमेदवारांनी केला आहे. 
 
'निक्रा'चेही केंद्र बंद 
 निक्रा प्रकल्पाअंतर्गत बसविण्यात आलेले स्वयंचलित हवामान केंद्र बसवून साधारण 12 वर्षे झाली आहेत. शेकटा (ता. गंगापूर) येथे दत्तक गावासाठी मंजूर झालेले हवामान केंद्र सुरक्षेच्या कारणास्तव औरंगाबादेत बसविण्यात आले होते. जवळपास साडेतीन वर्षांपासून हे केंद्र बंद असून, आपल्याकडे केव्हीके पदाचा पदभार आल्यापासून पाठपुरावा करूनही यश मिळाले नसल्याचे केव्हीके प्रमुख प्रा. दीप्ती पाटगावकर यांनी सांगितले. यातील काही सामग्री आयएमडीच्या तज्ज्ञांकडून काढून नेण्यात आल्याचेही त्या म्हणाल्या. 
 

आजवर रखडलेली प्रक्रिया येत्या दोन ते तीन महिन्यांत होण्याची शक्‍यता आहे. आयएमडीच्या निर्देशानुसार दोन पदांची भरती प्रक्रिया राबवली आहे. 
- प्रा. दीप्ती पाटगावकर, केव्हीके प्रमुख. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Waiting for automatic weather station