भरपावसाळ्यात पिकांनी टाकल्या माना, निम्मा खरीप वाया

सुषेन जाधव
सोमवार, 15 जुलै 2019

पावसाची दडी अजूनपर्यंत कायमच आहे. पैठण तालुक्‍यातील नांदर मंडळात अजूनही पेरणीलायक पाऊस झाला नाही. रानातली ढेकळंही भिजली नाहीत. त्यामुळे तालुक्‍यातील जायकवाडीच्या पायथ्याखालचीही रानं बोडखी दिसत आहेत. 

औरंगाबाद - अपुरे पर्जन्यमान, रानात ओल नाही. पेरण्या खोळंबलेल्या, पीककर्ज मिळेना. त्यामुळे खासगी सावकारांचे दार ठोठवावे लागलेय, दुसरीकडे सरकारच्या धोरणांची अंमलबजावणी नाही या गर्तेत अडकलेल्या शेतकऱ्यांना आता पीकविम्याचाही आधार मिळत नाही. दरम्यान, जेही पेरले त्या पिकांनी भरपावसाळ्यात माना टाकल्या आहेत. त्यामुळे आता कितीही पाऊस झाला तरीही निम्मा खरीप वाया जाणार आहे. परिणामी, पुरते मेटाकुटीस आलेले शेतकरी "सांगा आता धीर तरी कुठवर धरू?' असा प्रश्‍न विचारत आहेत.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठा खरेदी केल्या; मात्र पावसाची दडी अजूनपर्यंत कायमच आहे. पैठण तालुक्‍यातील नांदर मंडळात अजूनही पेरणीलायक पाऊस झाला नाही. रानातली ढेकळंही भिजली नाहीत. त्यामुळे तालुक्‍यातील जायकवाडीच्या पायथ्याखालचीही रानं बोडखी दिसत आहेत. रानातली ढेकळंही भिजली नाहीत. त्यामुळे तालुक्‍यातील जायकवाडीच्या पायथ्याखालचीही रानं बोडखी दिसत आहेत. 

जिल्ह्यात केवळ 62 टक्के क्षेत्रावर पेरणी 
जिल्ह्यातील 7 लाख 18 हजार खरिपाच्या क्षेत्रापैकी चार लाख 60 हजार 621 हेक्‍टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली असून, ही टक्केवारी 62 टक्के इतकी आहे. असे असले तरी पेरा झालेल्या क्षेत्रावरील पिकाची स्थिती नाजूक आहे. 

कपाशी धोक्‍यात 
पैठण तालुक्‍यातील कुतूबखेडा, नांदर, दावरवाडी भागातील काही शेतकऱ्यांच्या शेतात "सकाळ' टीमने पाहणी केली. पहिला पेरणीलायक पाऊस झाला तेव्हा कुतूबखेड्याचे संदीप काकडे या शेतकऱ्याने दीड एकरात ड्रीपवर कपाशी लावली होती. बियाण्यासह तीन हजारांवर खर्च केला; मात्र सध्या पावसाअभावी नेमकेच उगवलेल्या कपाशीने जागीच माना टाकायला सुरवात केल्याचे दिसले. 

रोज तीन हजार रुपयांचे विकत पाणी 

श्री. काकडे यांनी तीन एकरांत चारशे मोसंबीची, तर तीन एकरांत साधारण नऊशेवर डाळिंबाची झाडे लावलेली आहेत. भरपावसाळ्यात फळबागा जळून गेल्या आहेत. त्या वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड निसर्गाला बघवेनाशी झाली की काय, अशा भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत. पैठण तालुक्‍यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांनी कडाक्‍याच्या उन्हात बागा जगविल्या;
मात्र पावसाळ्यात जूनमध्येच बागा जळून गेल्याचे चित्र आहे. 

विद्यापीठाचे ऐकावे की नको 
कृषी विद्यापीठ सांगते लागवड करताना (बेसल डोस) खते द्या; पण लागवडीनंतर पाऊसच पडत नाही. अजूनही पुरेसा पाऊस पडला नाही. मग ऐकावं तरी कोणाचं, अशी परिस्थिती झाल्याचे शेतकरी सांगतात. 
 

तोकडे संशोधन शेतकऱ्यांच्या मुळावर 
परभणी येथील वसंतराव नाईक मराठावाडा कृषी विद्यापीठाने तुरीचे बीडीएन -711 हे कोरडवाहूसाठीचे वाण विकसित केले; मात्र या वाणाशिवाय बदलत्या हवामानात तग धरणारे, कमी पावसात, कमी दिवसांत येणारे वाण विकसित होईल की नाही किंवा अजून किती काळ लोटणार आहे, असा सवाल शेतकरी करीत आहेत. 
 

कृषी विद्यापीठाचे संशोधन कुचकामी 
जिल्हाभरात सर्वांत जास्त सिल्लोड तालुक्‍यात मका पिकांचे उत्पादन घेतले जाते; मात्र यंदा पेरणीनंतर दहा दिवसांचे पीक असतानाच त्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. परभणी कृषी विद्यापीठाच्या औरंगाबाद येथील कृषी विज्ञान केंद्र, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पातील शास्त्रज्ञांच्या मते या प्रादुर्भावामुळे मका पिकाचे जवळपास 60 ते 70 टक्‍क्‍यांवर नुकसान होते; परंतु एखाद्या पिकांवर कीडरोगांवर नियंत्रण मिळविण्याचे उपाय करण्यासोबतच प्रादुर्भाव होण्याआधी त्याची लक्षणे कळत नाहीत का? यामुळे विद्यापीठाच्या संशोधनावर प्रश्‍नचिन्ह निर्माण होत असून, संशोधन कुचकामी ठरतेय का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

जिल्हा अजूनही तहानलेलाच 
पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला तरी औरंगाबाद जिल्ह्यातील 12 लाख 17 हजार 529 इतकी लोकसंख्या अजूनही पाणीटंचाईचा सामना करीत आहे. जिल्ह्यात 633 वाड्या वस्त्यांची संख्या आहे. याशिवाय अजूनही जिल्हाभरात 707 टॅंकर सुरू असून, 232 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. 
 

...तर फळबागा गेल्या नसत्या 
पैठण तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी मृग बहाराचा पीकविमा भरला; मात्र अजूनही त्याचा परतावा मिळालेला नाही. एकीकडे अस्मानी संकटांची मालिका सुरू झाली असताना दुसरीकडे सुलतानी संकटे आणखी किती दिवस शेतकऱ्यांना झेलावी लागणार आहेत, या विवंचनेत शेतकरी अडकले आहेत.  दुष्काळ जाहीर होतो, मदतही जाहीर होते; पण मिळत काहीच नाही. 
 

सोयगाव, कन्नड भागांतही पिके कोमेजली 
मका पिकाची सध्या दीड ते दोन फुटांपर्यंत वाढ झालेली आहे. वेळीच उपाय केल्याने सध्या नियंत्रणात आहे. पावसावर लागवड केलेली कपाशी अर्ध्या फुटांवर असून, चार-पाच दिवसांत जर काहीच पाऊस पडला नाही तर हातचा खरीप जाण्याची भीती तिडका (ता. सोयगाव) येथील ईश्‍वर सपकाळ या शेतकऱ्याने व्यक्त केली. सोयगाव, कन्नडसह खुलताबाद तालुक्‍यातील या पिकांची स्थिती गंभीर झाल्याचे चित्र आहे. 
 

गंगापूर, पैठण, खुलताबादला पावसाची नितांत गरज 
जिल्ह्यात सरासरीच्या 76 टक्के पाऊस झाल्याची आकडेवारी असली तरी औरंगाबाद आणि फुलंब्री तालुके वगळता इतर तालुक्‍यांत अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे अद्यापही पेरण्या खोळंबल्या आहेत. फुलंब्री तालुक्‍यात 180.25 (96.18 टक्के), पैठण 89.00 (55.80 टक्के) , सिल्लोड 112.06 (61.20 टक्के) ,
सोयगाव 149.99 (74.55 टक्के), कन्नड 122.18 (60.22 टक्के), वैजापूर 106.40 (82.10 टक्के), गंगापूर 90.56 ( 54.55), तर खुलताबाद
तालुक्‍यात 100.65 (48.18 टक्के) मिलिमीटर पाऊस पडला. 
 
 

कपाशी, डाळिंब, मोसंबी या कशाचा विमा, दुष्काळी अनुदान मिळाले नाही. पाच रुपये टक्‍क्‍याने खासगी सावकाराकडून पैसे घेऊन रोज तीन हजार रुपयांचे पाणी विकत घेऊन पीक जगवणे सुरू आहे. दुसरीकडे अधिकाऱ्यांना पैसे दिल्याशिवाय रेशीम शेतीचे मस्टर भरल्या जात नाही. 
 संदीप काकडे, शेतकरी, कुतूबखेडा 
 
आमच्या बोरसर मंडळात 20 हेक्‍टरपेक्षा जास्त डाळिंबाचे क्षेत्र आहे; पण आंबे बहारासाठी विमा लागू होतो. मग आम्ही मार्केटच्या अनुषंगाने आंबे बहार घेऊन चूक केली का ? विमा
मिळण्यासाठी एक तर दुसऱ्या मंडळात समावेश करावा किंवा फळ पीकविमा योजना सुरू करावी. तब्बल वर्षभरापूर्वी आंबे बहारासाठी भरलेल्या विम्याची परतावा रक्कम दोन दिवसांपूर्वी
मिळाली. क्षेत्राचा निकष नसावा. 
दादासाहेब गायके, शेतकरी, भिवगाव (ता. वैजापूर) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Waiting for rain in Aurangabad district