धरण भरण्याची आता प्रतीक्षा

चंद्रकांत तारु
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

नाशिक जिल्ह्यातील पाऊस बंद झाल्याने येथील जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने होणारी वाढही बंद झाली आहे. बुधवारी (ता. 14) धरणाचा पाणीसाठा 92 टक्के झाला आहे. दरम्यान, स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जायकवाडी धरणाने टक्केवारीच्या शंभरीकडे प्रवास सुरू केल्यामुळे जलसंपदा विभागाच्या धरण व्यवस्थापाने धरणावर आकर्षक विद्युत रोषणाई करून आनंदोत्सव साजरा केला.

पैठण  (जि.औरंगाबाद ) : नाशिक जिल्ह्यातील पाऊस बंद झाल्याने येथील जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने होणारी वाढही बंद झाली आहे. बुधवारी (ता. 14) धरणाचा पाणीसाठा 92 टक्के झाला आहे. दरम्यान, स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जायकवाडी धरणाने टक्केवारीच्या शंभरीकडे प्रवास सुरू केल्यामुळे जलसंपदा विभागाच्या धरण व्यवस्थापाने धरणावर आकर्षक विद्युत रोषणाई करून आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी धरणाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे, उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण, सहायक अभियंता बुद्धभूषण दाभाडे, संदीप राठोड, आर. ई. चक्रे, अनिकेत हसबनीस आदींनी धरण विद्युतरोषणाईचा आनंद लुटला. धरणाच्या पाणीपातळीत वाढ होण्याला आजपर्यंत 18 दिवस झाले असून, या काळातील तब्बल 15 दिवस पाणीपातळी झपाटयाने वाढली होती. यामुळे धरण व तालुका प्रशासनही सतर्क झाले होते; परंतु आता पाण्याची आवक घटल्यामुळे प्रशासनाच्या हालचाली थांबल्या. पाणी वाढ होण्यास पुन्हा कधी सुरवात होते याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, गोदापात्रातील आपेगाव, हिरडपुरी बंधारा, धरणाचा डावा, उजवा कालवा यांत एकूण तीन हजार 700 पाण्याचा क्‍युसेक विसर्ग केला जात आहे. यामुळे पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यात आली आहे.
-----
शंभर टक्के पातळीसाठी
पुन्हा दमदार पावसाची अपेक्षा
ता. 27 जुलैला धरणात पाणी येण्यास प्रारंभ झाला. यानंतर धरणात दाखल झालेल्या पाण्यामुळे मृतावस्थेत गेलेला साठा जिवंत झाला. पुन्हा नाशिक जिल्ह्यातील पावसाने दोन दिवसांची विश्रांती घेतली व पुन्हा दमदार पावसाला सुरवात झाली. त्यामुळे नाशिक येथे गोदावरीला महापुराने वेढले. या वेढलेल्या महापुराचे पाणी जायकवाडीत दाखल झाले व पातळीने 90 टक्‍क्‍यांहून अधिक पातळी गाठली आहे. आता केवळ आठ टक्के पाण्याची आवश्‍यकता असून यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: waits for filling jayawadi dam