लातूरमध्ये भिंत कोसळून आई, मुलाचा जागीच मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

लातूर - येथील गंजगोलाईत जुन्या इमारतीची भिंत कोसळून आई व मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. 16) घडली. याप्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लातूर - येथील गंजगोलाईत जुन्या इमारतीची भिंत कोसळून आई व मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. 16) घडली. याप्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

येथील गंजगोलाई भागात मस्जीद रस्त्यावर ब्रिजवासी यांची जुनी इमारत आहे. या इमारतीच्या मागील भिंत बुधवारी कोसळली. या घटनेच्या वेळी कविता बाळासाहेब लोंढे (वय 37) व विलास बाळासाहेब लोंढे (वय 14) हे दोघे रस्त्याने जात होते. त्यांच्या अंगावरच ही जुनी भिंत कोसळली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड, महापौर ऍड. दीपक सूळ, उपअधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसीलदार संजय वारकड, पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांनी भेट देऊन पाहणी केली. जेसीबीच्या साहाय्याने भिंतीच्या विटा बाजूला करून रस्ता मोकळा करण्यात आला. अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान, काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट दिली.

महापालिकेने 2009 ते 2012 या कालावधीत श्री. ब्रिजवासी यांनी धोकादायक इमारत पाडून घ्यावी यासंदर्भात वारंवार नोटिसा दिल्या होत्या. त्यानंतर श्री. ब्रिजवासी यांनी न्यायालयात जाऊन मनाई हुकूम आणला. त्यामुळे महापालिकेला काही कारवाई करता आली नाही. यात आता ही घटना घडली आहे. कायदेशीर सल्ला घेऊन या याप्रकरणी कारवाई करता येईल हे पाहून तसेच न्यायालयातही महापालिकेच्या वतीने बाजू मांडली जाईल, अशी माहिती महापौर ऍड. दीपक सूळ यांनी दिली.

Web Title: wall collapsed in Latur mother & child died on the spot