वालसावंगी बनलंय डॉक्‍टरांचं गाव 

Walsawangi
Walsawangi

वालसावंगी (जि.जालना) -   मिरची बाजारपेठ म्हणून  भोकरदन तालुक्यातील वालसावंगीची ओळख आहे. मात्र, आता हेच गाव डॉक्‍टरांचे म्हणून नावारूपाला येऊ लागले आहे. येथील तीस भूमिपुत्र डॉक्‍टर असून विविध शहरांत वैद्यकीय सेवा देत आहेत. बालरोगापासून ते हृदयरोग, भूलतज्ज्ञ, मेंदुविकारतज्ज्ञ, न्यूरोसर्जन यासह सर्व वैद्यकीय विभागांत त्यांचा दबदबा आहे. विशेष म्हणजे यंदाही डॉक्‍टरसंख्येत भर पडली आहे. 

हे आहेत येथील डॉक्‍टर 

वालसावंगी येथील डॉ. देविदास कोथळकर, डॉ. सुभाष जोशी, डॉ. अमोल कोथळकर, डॉ. ऋषिकेश जोशी, डॉ. स्वप्नील कोथळकर, डॉ. जैस्वाल, डॉ. कांचन कोथळकर, डॉ. सचिन फुसे, डॉ. ऋषिकेश फुसे, डॉ. ज्ञानेश्वर फुसे, डॉ. संदीप बोडखे, डॉ. नीलेश भुते, डॉ. अनिल लाठे, डॉ. भूषण आखाडे, डॉ. पवन आखाडे, डॉ. विनय जैस्वाल, डॉ. नारायण अस्वार, डॉ. जनार्दन वडगावकर, डॉ. बेलाअप्पा आखाडे, डॉ. दिलीप भुते, डॉ. रत्नदीप अस्वार, डॉ. शीतल बोडखे, डॉ. नीलेश मळेकर, डॉ. प्रवीण भाले, डॉ. आकाश वाघ, डॉ. जगदीश जैस्वाल, डॉ. स्वप्नील जैस्वाल, डॉ. शीतल वाघ हे विविध ठिकाणी वैद्यकीय सेवा देत आहेत. 

अनेकांच्या पत्नीसुद्धा डॉक्‍टर  

वैद्यकीय क्षेत्रात अनेकांच्या पत्नीसुद्धा डॉक्‍टर असल्याने त्यादेखील वैद्यकीय सेवा प्रदान करत आहेत. येथील भूमिपुत्र असलेल्या डॉक्‍टरांनी स्वतःचे हॉस्पिटल उघडले आहे. तर काही इतर हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सेवा देतात. 

यंदा पुन्हा चारजण 

येथील सागर ओफळकर, नेहा खडके, भाग्यश्री पायघन, किरण फुसे यांनी नुकतेच वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळे डॉक्‍टरांच्या संख्येत अजून वाढ झाली आहे. तर पायल जोडपे, कुणाल फुसे, अनुष्का भुते, शुभम मळेकर, निकिता कोथळकर, नीलाक्षी फुसे हे वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. 

मातीचे फेडतात ऋण 

यातील अनेक डॉक्‍टर हे बुलडाणा, औरंगाबाद या ठिकाणी वैद्यकीय सेवा देतात. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जर वालसावंगी येथील रुग्ण गेल्यास त्याची आवर्जून विचारपूस करतात. अगदी माफक शुल्क त्यांच्याकडून घेतात. येथील अन्य दवाखान्यांत जर अडचण येत असल्यास तत्काळ संबंधित डॉक्‍टरांना सहकार्य करण्याची विनंती करतात. वालसावंगीतही आरोग्य शिबिर घेतले जाते. एकप्रकारे जणू ते मातीचे ऋण फेडत आहेत. 

ज्या मातीत आपण वाढलो, खेळलो, रमलो अशा मातीचे ऋण फेडणे हे कर्तव्यच आहे. आमच्या यशात गावाचाही मोठा वाटा असल्याने गावकऱ्यांना सेवा पुरवीत आहोत. शेवटी समाजाचे देणे हे प्रत्येकाला चुकवावे लागतेच. 
- डॉ. अमोल कोथळकर 

व्यक्ती कितीही मोठी झाली, कितीही आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली तरी ती आपल्या जन्मभूमीला विसरू शकत नाही. त्यामुळे आम्हीदेखील गावकऱ्यांची सेवा करतो आहोत. आरोग्य दृष्टीने येणाऱ्या समस्यांच्या निराकरणासंबंधी मार्गदर्शन करतो. 
- डॉ. संदीप बोडखे, भूलतज्ज्ञ, औरंगाबाद. 

काही दिवसांपूर्वी मी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे. गावामध्ये असलेल्या डॉक्‍टरांचा आदर्श घेऊन मी हे क्षेत्र निवडले. आता या क्षेत्रामध्ये पुढील शिक्षण घेण्याचा मानस आहे. गावासाठी जी शक्‍य होईल ती वैद्यकीय मदत, मार्गदर्शन करणार आहे. 
- डॉ. भाग्यश्री पायघन 

वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची आवड अगोदरपासून होती. शिवाय भाऊदेखील डॉक्टर. त्यामुळे या क्षेत्रासोबत ॲटॅचमेंट राहिलेली आहे. 
- डॉ. किरण फुसे 

वडील शेतकरी असल्याने अनेक कष्ट करून त्यांनी माझे शिक्षण पूर्ण केले. गावात डॉक्टरांची संख्या जास्त असल्याने त्यांनी मलादेखील डॉक्टर व्हावे यासाठी तयार केले. त्यांचे स्वप्न मी आज साकार केले. 
- डॉ. सागर ओफळकर

अनेक संकटांवर मात करत मी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे. होईल तेवढा वैद्यकीय फायदा, मार्गदर्शन मी गावासाठी करणार असून, या वैद्यकीय क्षेत्रात अजून उच्चशिक्षण मी घेणार आहे. 
- डॉ. नेहा खडके 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com