पत्नीचा खून केल्यानंतर पतीनेही घेतला गळफास

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

वाळूज - दारूच्या व्यसनाबद्दल दूषणे देणाऱ्या पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना शनिवारी सकाळी सातच्या सुमारास वाळूज येथील सिडको महानगरात उघडकीस आली. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.

वाळूज - दारूच्या व्यसनाबद्दल दूषणे देणाऱ्या पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना शनिवारी सकाळी सातच्या सुमारास वाळूज येथील सिडको महानगरात उघडकीस आली. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.

प्रवीण प्रभाकर पाटील (वय ३२) आणि आरती प्रवीण पाटील (वय २६, दोघे रा. गुरुदक्षिणा अपार्टमेंट, सिडको वाळूज) असे मृत दांपत्याचे नाव आहे. 
पोलिसांनी सांगितले, की प्रवीण हा एका खासगी कंपनीत काम करायचा, तर आरती गृहिणी होती. त्यांना ९ वर्षे आणि दीड वर्षाची दोन मुले आहेत. प्रवीण राहत असलेल्या अपार्टमेंटमध्येच त्याचे सासू-सासरे, भाऊ हे स्वतंत्र फ्लॅटमध्ये राहतात. प्रवीण अधूनमधून मद्य प्राशन करीत होता. त्यामुळे पती-पत्नीत वाद होत असत. तीन दिवसांपूर्वी प्रवीण पुन्हा मद्य प्राशन करून आला होता. त्यावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला आणि आरती रागाच्या भरात खालच्या मजल्यावर राहणाऱ्या माहेरच्यांकडे दोन मुलांसह गेली. त्याचा प्रवीणला राग आला होता. तो पत्नीला आणायला सासऱ्यांकडे गेला. तिथे पुन्हा मद्य न पिण्याचे वचन प्रवीणने शुक्रवारी पत्नी आणि सासू-सासरे यांना दिले. त्यानंतर रात्री या दांपत्याने आरतीच्या माहेरीच जेवण केले आणि मध्यरात्री बाराच्या सुमारास आरती दोन मुलांना सोबत घेऊन प्रवीणसोबत स्वतःच्या घरी आली. समोरच्या हॉलमध्ये प्रवीणचे वडील, तर त्यांच्या बेडरूमध्ये दोन्ही मुले झोपली होती. मध्यरात्रीनंतर प्रवीणने आरतीचा गळा आवळून खून केला नंतर त्याने स्वयंपाक खोलीत जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली.

शनिवारी सकाळी सातच्या सुमारास मोठ्या मुलाच्या शाळेची वेळ झाली, तरी कोणीही झोपेतून उठले नाही म्हणून प्रवीणचे वडील हॉलमधून आत गेले; तेव्हा त्यांना प्रवीणने गळफास घेतल्याचे दिसले. त्यांनी लागलीच खालच्या मजल्यावर जाऊन प्रवीणचा भाऊ आणि सासू-सासऱ्यांना या घटनेची माहिती दिली. त्यांनी आत जाऊन पाहिले असता आरतीचा मृतदेह दिसला. या घटनेची माहिती वाळूज  एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला.

Web Title: waluj news murder suicide