कारवाईचा इशारा विरला आगीच्या धुरात  

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

औरंगाबाद - शहरात कचऱ्याला आगी लावण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून, आतापर्यंत लागलेल्या आगींचा आकडा शेकडोंच्या घरात असताना महापालिकेने आतापर्यंत फक्त एका कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. आगी लावणाऱ्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्याचा महापालिका प्रशासनाने दिलेला इशारा आगीच्या धुरात विरला असल्याने प्रदूषण धोकादायकरीत्या वाढत आहे. 

शहरातील कचऱ्याची कोंडी ५७ व्या दिवशीदेखील कायम आहे. कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर बनल्यापासून गेल्या दीड-दोन महिन्याच्या काळात प्रशासन पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेले बैठकांचे सत्र अद्याप सुरूच असून, त्यातून काहीच हाती लागत नसल्याने महापालिकेची नाचक्की होत आहे. प्रभाग एक, दोन, तीनमध्ये अद्याप दररोज तीस टक्के कचरा ओला-सुका मिक्‍स स्वरूपात येत आहे. सुक्‍या कचऱ्याचा ढीग सुमारे दोन हजार टनांच्या घरात गेला आहे; मात्र प्रशासनाचा केवळ इशाऱ्यांचा खेळ सुरू आहे. कचऱ्याला आगी लावणाऱ्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला होता.

 या इशाऱ्यानंतरही दररोज किमान चार ते पाच ठिकाणी कचऱ्याला आगी लावण्याच्या घटना घडत आहेत. विशेष म्हणजे याची नोंद महापालिकेचाच विभाग असलेल्या अग्निशमनकडे आहे. असे असताना महापालिकेने आतापर्यंत केवळ एका कर्मचाऱ्यावर कचऱ्याला आग लावली म्हणून निलंबनाची कारवाई केली आहे; मात्र गुन्हे कोणावरच दाखल करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे आग लावण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातून निघणाऱ्या धुरामुळे प्रदूषण धोकादायकरीत्या वाढले असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

Web Title: Warning of the fire in aurangabad pollution