वाहनधारकांना ईशारा : वसमतमध्ये चक्क यमराज रस्त्यावर उतरले; रस्ता सुरक्षा अभियान

पंजाब नवघरे 
Tuesday, 26 January 2021

वसमत शहर पोलिस ठाण्यातर्फे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत शहरातून पोलिसांनी वाहन चालविताना हेल्मेट कसे महत्वाचे आहे. हेल्मेटमुळे अपघातात किती धोका टळतो याची माहिती यावेळी दिली.

वसमत ( जिल्हा परभणी ) : वसमतमध्ये मंगळवारी (ता. २६) जानेवारी चक्क यमराज रस्त्यावर उतरल्याने वसमतकर सुद्धा हैरान झाले. निमित्त होतं शहर पोलिस ठाण्याचे रस्ता सुरक्षा अभियान. झेंडा चौकामध्ये चक्क यमराज उतरल्याने यमराजाला पाहण्यासाठी सुद्धा लोकांनी एकच गर्दी केली.

वसमत शहर पोलिस ठाण्यातर्फे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत शहरातून पोलिसांनी वाहन चालविताना हेल्मेट कसे महत्वाचे आहे. हेल्मेटमुळे अपघातात किती धोका टळतो याची माहिती यावेळी दिली. तसेच हेल्मेटधारी पोलिसाची रॅली यावेळेस काढण्यात आली. तसेच रस्त्यावर वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील व काय केले पाहिजे याबाबत जनजागृतीचे फलक लावुन रॅली काढण्यात आली तसेच गणेश मिल्ट्री विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शहरातून तिरंगा रॅली काढून वसमतकरांची मने जिंकली. 

हेही वाचा  नांदेड जिल्हा वार्षिक योजनेसाठी 462. 91 कोटीच्या प्रारुप आराखड्याला मान्यता

शहर पोलिस ठाण्याच्या वतीने आयोजीत रस्ता सुरक्षा अभियानात अपघात झाल्यानंतर अपघाताचे ठिकाणी असणाऱ्या नागरिकांनी जखमींना कशी मदत केली पाहिजे. किंवा त्यांना रुग्णालयापर्यंत कसे पोचविले पाहिजे. याचे प्रात्यक्षिकसुद्धा यावेळी करुन दाखवण्यात आले. तसेच अपघात झाल्यानंतर नियम न पाळता भरधाव वेगाने गाडी चालवत असताना अपघात झाल्यावर अपघातात मृत्युमुखी पडलेल्याला यमराज कसा घेऊन जातो याचे प्रात्यक्षिक सुद्धा यावेळी करण्यात आले.

यावेळी गोंधळी यांच्या माध्यमातून भारुडातुन संबळ वाजवून पथनाट्यद्वारे जनजागृतीपर प्रबोधन करण्यात आले. तत्पूर्वी या कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार अरविंद बोळंगे, उपनगराध्यक्ष सिताराम मॅनेवार, पोलीस निरिक्षक शिवाजी गुरमे, सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, श्रीदेवी पाटील, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश आवडे, गजानन बर्गे, बाळासाहेब खार्डे, पोलिस कर्मचारी राजु सिद्दीकी, भगीरथ सवंडकर, श्री. थोरात, कृष्णा चव्हाण, रवि ढेंबरे, शंकर हेंद्रे यांच्यासह वाहतूक पोलिस कर्मचारी प्रभू धुर्वे, बालाजी वडगावे, सुनील गोरलावाड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नामदेव दळवी यानी केले.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Warning to vehicle owners: Road safety campaign on Yamaraj Road in Wasmat hingoli news