नांदेडमधील रिकाम्या भूखंडाचे होते काय? 

अभय कुळकजाईकर
शनिवार, 14 डिसेंबर 2019

नांदेड शहरामध्ये जिल्हा प्रशासनासह महापालिकेचे भूखंड मोठ्या प्रमाणावर मोकळे पडलेले आहेत. परिणामी त्याठिकाणी अतिक्रमणे होत असून, प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

नांदेड : शहर आणि शहरालगत असलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर वस्ती वाढत चालली आहे. दुसरीकडे मात्र मोकळ्या जागा (ओपन स्पेस), क्रीडांगण, बगीचा आदीसाठी आरक्षित केलेल्या भूखंडाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी या भूकंडांवरील अतिक्रमणाचा प्रश्‍न आता महापालिका प्रशासनाला भेडसावत अतानाही, कुंभकर्णी झोपेत असलेले कारभारी अद्यापही जागे होताना दिसत नाही.  

नांदेड शहरासह आजूबाजूच्या गावांमध्ये दिवसेंदिवस बांधकामे वाढू लागली आहेत. महापालिका हद्दीत तसेच शहरालगत असलेल्या ग्रामपंचायतीमध्येही बांधकामे, व्यापारी संकुले उभी राहत आहेत. एकीकडे बांधकामांची संख्या वाढलेली असताना दुसरीकडे महापालिका प्रशासनाचे मात्र रिकाम्या भूखंडाकडे दुर्लक्ष होत आहे. गृहनिर्माण सोसायटीच्या मोकळ्या जागा, ग्रामपंचायत किंवा महापालिकेच्या वतीने क्रीडांगण, बगीचा, रुग्णालय आदींसाठी आरक्षित केलेल्या भूखंडावर काही ठिकाणी अतिक्रमण झालेली आहेत. काही ठिकाणी अतिक्रमण होण्‍याची शक्यता आहे. त्यामुळे त्याची वेळीच दखल जिल्हा प्रशासनासह महापालिकेने घेतली नाही तर भविष्यात रिकाम्या जागाच शिल्लक राहणार नाहीत. त्यामुळे कारभाऱ्यांना वेळीच जागे करण्याची वेळ आता येवून ठेपली आहे.

हेही वाचा - खबरदार...! मटका, जुगार चालवाल तर..

रिकाम्या भूखंडांची नोंदच नाही
नांदेड शहर आणि आजूबाजूच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत प्रशासनाचे रिकामे भूखंड किती आहेत, याची नोंद असणे आवश्यक आहे. मात्र, त्याचीही नेमकी आकडेवारी प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नांदेड शहरालगत असलेल्या वाडी, विष्णुपुरी, नसरतपूर, वाजेगाव आदी गावांमध्ये मोठ्याप्रमाणावर मोकळे भूखंड आहेत. परंतु, येथे आता अतिक्रमणे उभी राहत असल्याने प्रशासनाने वेळीच काळजी घेणे आवश्‍यक झाले आहे. अनेकांचा अशा रिकाम्या भूखंडावर डोळा असून ते त्यावर अतिक्रमण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

 

महापालिका हद्दीतील रिकाम्‍या भूखंडाची संख्या
तरोडा खुर्द - १०७, तरोडा बुद्रुक - ६९, सांगवी - सात, म्हाळजा - तीन, असदुल्लाबाद - ब्रह्मपुरी - ३३, जंगमवाडी - ११, नांदेड - ११, वजिराबाद - २२, कौठा - ५६

हेही वाचलेच पाहिजे - ब्रेन फिटनेससाठी काय करावे?

कार्यवाही सुरु आहे

प्रशासनाच्या वतीने रिकाम्या भूखंडावर अतिक्रमण होऊ नये, यासाठी क्षेत्रीय कार्यालयामार्फत लक्ष देण्यात येत आहे. त्याचबरोबर अतिक्रमण होऊ नये व झाल्यास ते काढण्यासाठी पथकेही तयार ठेवण्यात आली आहेत. महापालिकेच्या मालमत्ता तसेच मोकळी जागा ज्या ठिकाणी आहेत, त्याच्या नोंदी ठेवण्यात आल्या आहेत. आयुक्त लहुराज माळी यांनी याबाबत बैठक घेऊन आढावा घेतला असून त्यानुसार कार्यवाही सुरु आहे.
- विलास भोसीकर, उपायुक्त.
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Was there an empty plot in Nanded?