अभ्यास, मेहनत अन् जिद्दीच्या जोरावर वसिमा बनली उपजिल्हाधिकारी

Deputy Collector Washima Sheikh Latur
Deputy Collector Washima Sheikh Latur

जळकोट (जि.लातूर) : अभ्यास, परिश्रम अन् जिद्द असल्यास यश कसे आपल्या मागे धावत येते हे पाटोदा बुद्रुक (ता. जळकोट) येथील चांदसाहब मुल्ला यांच्या सूनबाई वसिमा महेबूबसाब शेख (वसिमा हैदर मुल्ला) यांनी दाखवून दिले. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत खुल्या प्रवर्गातून या परीक्षेत ५२४ गुण घेऊन राज्यात तिसरा क्रमांक मिळवीत उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली आहे.


त्यांनी गरिबी, हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत केलेला प्रवास इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. त्यांनी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
मूळच्या जोशी सांगवी (ता. लोहा, जि. नांदेड) येथील एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या वसिमा शेख यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत, तर माध्यमिक शिक्षण बाचोटी (ता. कंधार) येथे झाले. पुढे नांदेडला डायटमध्ये डी.एड. केले. परिस्थिती नसल्यामुळे घरीच अभ्यास करीत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवी मिळविली; परंतु जिद्द सोडली नाही. स्पर्धा परीक्षेत यश मिळवीत त्या विक्रीकर निरीक्षक झाल्या. सध्या वसिमा या नागपूर येथे कार्यरत आहेत. वरिष्ठ अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यांनी सतत अभ्यास, कठोर परिश्रम करीत जिद्दीने प्रयत्न सुरू केले. परीक्षा देत कुठल्याही स्थितीत यश मिळविण्याचा निश्चय केला. त्यामुळे मला हे यश मिळाले, असे वसिमा सांगतात. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. स्वतःचे घर नाही, दोन भाऊ नांदेड शहरात रिक्षा चालवून शिकविले, तर आई मजुरी करीत कुटुंबाला हातभार लावते. वडील मानसिक रुग्ण. अशा प्रतिकूल परिस्थितीची मनात कुठे तरी खंत होती. आपण काही तरी केले पाहिजे, यशस्वी होऊन परिस्थितीवर मात केली पाहिजे, या एकाच विचाराने अभ्यासात सातत्य ठेवल्यामुळे त्यांना हे यश मिळाले, असेही त्यांनी स्पर्धा परीक्षेतील यशाचा मंत्र सांगितला. पुढे त्यांची भारतीय लोकसेवा आयोगात (यूपीएससीत) यश मिळवायची इच्छा आहे.


विशेष बाब म्हणजे या टाळेबंदीच्या काळात आठ जून रोजी वसिमा यांचा विवाह पाटोदा बुद्रुक (ता. जळकोट) येथील हैदर चांदसाहब मुल्ला यांच्याशी झाला आहे. एका गरीब कुटुंबातील मुलीने आपली जिद्द, कौशल्य व अभ्यासातील सातत्य यामुळे हे यश संपादन केले आहे. इच्छाशक्ती प्रबळ असल्यास परिस्थितीवर मात करून यश कसे संपादन करता येते, हेच वसिमाने दाखवून दिले आहे. या यशाबद्दल राज्यमंत्री संजय बनसोडे, गावचे सरपंच बाबूराव गुट्टे, लहुकुमार जाधव, डॉ. गोपीनाथ केंद्रे, बाजार समिती सभापती मन्मथअप्पा किडे, पंचायत समिती सभापती बालाजी ताकबिडे, जिल्हा परिषदेचे सदस्य संतोष तिडके, माजी सदस्य उस्मान मोमीन, जिल्हा बँकेचे संचालक धर्मपाल देवशेट्टे, खादरभाई लाटवाले, महेताब बेग, विनायक जाधव, बालाजी उगिले आदींनी अभिनंदन केले आहे. वसिमाला युनिक अॅकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव व प्रा. पी.डी.चव्हाण यांनी मार्गदर्शन केले आहे.


परिस्थितीवर मात करीत आपल्याला प्रयत्नांतून अशा क्षेत्रात यश मिळविता येते; परंतु त्यासाठी अभ्यासात सातत्य, जिद्द व कठोर परिश्रमाची तयारी ठेवावी लागते. यातून स्पर्धा परीक्षेत यश मिळविता आले, हे मी माझ्या अनुभवावरून सांगते. मला गरिबीमुळे हे शक्य होईल का? असा विचार कदापिही मी मनात आणला नाही. आई-वडिलांचे आशीर्वाद व शिक्षकांचे मार्गदर्शन मला मिळाले. मुलींनी आपल्या कष्टातून पुढे आले पाहिजे. या क्षेत्रात यश मिळवून प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याची संधी मिळविली पाहिजे. मला पुढे ‘यूपीएससी’मध्ये यश मिळवायचे आहे.
- वसिमा शेख (मुल्ला)

वसिमा यांचं यश हे खरं अत्यंत प्रेरणादायी आहे. अत्यंत खडतर परिस्थतीत देखील अभ्यासातील सातत्य राखणं हे त्यांचं महत्वाचं वैशिष्टय होतं. याआधी STI पदावर नियुक्तीनंतर देखील स्वप्नपूर्तीसाठी अभ्यासात खंड न पडू देणे हा त्यांचा गुण इतर विद्यार्थ्यांसाठी अनुकरणीय असा आहे. विशेषतः त्यांच्याच नव्हे तर सर्वच समाजातील मुलींना त्यांचे यश प्रेरणादायी आहे.
तुकाराम जाधव, संचालक, द युनिक ऍकॅडमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com