पोलिस भरतीवर सीसीटीव्हीचा वॉच 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

लातूर - जिल्हा पोलिस दलाच्या वतीने पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर बुधवारपासून (ता. 22) पोलिस भरतीला सुरवात झाली आहे. 33 जागांसाठी चार हजार उमेदवार आहेत. दररोज पाचशे ते आठशे उमेदवारांच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. या सर्व भरती प्रक्रियेचे व्हीडीओ चित्रीकरण तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर ठेवण्यात आली आहे. उमेदवारांचे बायोमॅट्रिक्‍सही घेतले जात आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी याकरिता पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड हे मैदानावर ठाण मांडून आहेत. 

ऑनलाईन प्रवेशपत्र 
या वर्षी पोलिस भरती प्रक्रियेत शासनाने उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवून घेतले होते. याकरिता चार हजार उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. ऑनलाईनच्या माध्यमातून उमेदवारांना प्रवेशपत्र देण्यात आले आहेत. पहिले दोन दिवस पाचशे तर नंतर आठशे उमेदवारांना प्रवेशपत्र देण्यात आले आहेत. तसेच भरतीचे व्हीडीओ चित्रीकरण केले जात आहे. इतकेच नव्हे, तर मैदानावर बारा सीसीटीव्ही कॅमेरे बसवून नजर ठेवली जात आहे. पोलिस अधीक्षक डॉ. राठोड यांच्या कक्षात या कॅमेऱ्यांचा नियंत्रण कक्ष ठेवण्यात आला आहे. 

उमेदवारांचे लगेच समाधान 
भरती प्रक्रियेत पहिल्या दिवशी छातीचे मोजमाप, गोळा फेकणे, उंची मोजणे, शंभर मीटर धावणे अशा चाचण्या घेतल्या जात आहेत. याचे गुण लगेच विद्यार्थ्यांना सांगण्यात येत आहेत. गुण लिहिणाऱ्या अधिकाऱ्यावरही कॅमेरे लावले आहेत. एखाद्याला शंका असेल तर त्याला चित्रीकरण दाखवून समाधान केले जाते. 

चाचण्यांनंतर कागदपत्रांची पडताळणी 
यंदा पहिल्यांदा चाचण्या घेऊन त्यातून निवड झालेल्याच उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांवरील ताणही कमी झाला आहे. सर्व चाचण्यांनंतर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. 

उमेदवारांचे बायोमॅट्रिक्‍स 
सर्व उमेदवारांचे बायोमॅट्रिक्‍स केले जात आहे. प्रत्येकाचा अंगठा घेतला जात आहे. एखाद्या उमेदवाराबाबत शंका निर्माण झाली तर त्याला बायोमॅट्रिक्‍सवर पुन्हा तपासणी केली जात आहे. 

""पोलिस भरती ही पारदर्शक पद्धतीने सुरू आहे. ही भरती गुणवत्तेच्या आधारावर होणार आहे. भरती प्रक्रियेचे व्हीडीओ चित्रीकरण तसेच सीसीटीव्ही चित्रीकरण सुरू आहे. त्यामुळे उमेदवारांनी किंवा त्यांच्या नातेवाइकांनी कोणत्याही आमिषाला किंवा प्रलोभनाला बळी पडू नये. जर कोणी यासाठी पैसे मागत असल्यास तातडीने संपर्क साधावा.'' 
- डॉ. शिवाजी राठोड, पोलिस अधीक्षक. 

Web Title: Watch CCTV of the police recruitment