टीव्ही पाहणे झाले महाग 

संदीप लांडगे
रविवार, 10 फेब्रुवारी 2019

आता महिन्याकाठी टीव्हीवर किमान 450 ते 600 रुपये खर्च होत आहे. पूर्वी तो 250 ते 350 होता.

औरंगाबाद - जेवढे चॅनेल पाहता, तेवढ्याच चॅनेलचे पैसे द्यावे लागणार, असे सांगत ट्रायने डीटीएच ग्राहकांसाठी नवीन नियमावली लागू केली; पण यामुळे टीव्ही पाहणे महाग झाले आहे. या नियमानुसार फ्री टू एअर चॅनेलसाठी 130 रुपये आणि जीएसटी असे 154 रुपये मोजावेच लागणार आहेत. त्यानंतरच आपल्या आवडीचे चॅनेल निवडता येणार आहेत; मात्र त्यावर शुल्काव्यतिरिक्त जीएसटीही द्यावा लागणार आहे. त्यामुळे आता महिन्याकाठी टीव्हीवर किमान 450 ते 600 रुपये खर्च होत आहे. पूर्वी तो 250 ते 350 होता.

 सध्या प्रत्येक ब्रॉडकास्ट कंपन्यांनी आपापले चॅनेल पॅक वेगवेगळ्या दरात उपलब्ध केले आहेत. त्यात एसडी आणि एचडी या चॅनेलला वेगवेगळे दर निश्‍चित करण्यात आले आहेत. हे दर साधारणतः तीस रुपयांपासून ते 120 रुपयांपर्यंत ठेवण्यात आले आहेत. प्रति चॅनेलचे दर 10 पैशांपासून ते 19 रुपयांपर्यंत आहेत; परंतु या प्रत्येक चॅनेल व पॅकेजेसवर ट्रायने कर लावला आहे. तसेच जे चॅनेल पूर्वी मोफत दाखवण्यात येत होते, त्याला दीडशे रुपये मोजावे लागत आहेत. त्यात कित्येक चॅनेल लोकांच्या आवडीचे नाहीत; परंतु अशा चॅनेलचे पैसे ग्राहकांना इच्छा नसतानाही मोजावेच लागणार आहेत. पूर्वी तीनशे रुपयांना मिळणारा चॅनेलचा पॅक आता फ्री टू एअर चॅनेलचे दीडशे, जीएसटी कर लागून साडेचारशे रुपयांच्या पुढेच मिळत आहे. 
 

सर्व लाइन व्यस्त 
पॅकेज निवडीसाठी मोठ्या प्रमाणात ग्राहक कंपन्यांना फोन करीत आहेत. त्यामुळे कंपनीच्या हेल्पलाइन व्यस्त आहेत. फोन लागला तरी त्यांच्याकडून चॅनेल पॅकेजबाबत माहिती न देता वेबसाईटवर जाऊन चॅनेलची निवड करावी, असे सांगण्यात येत आहे; मात्र ग्रामीण भागातील अनेक ग्राहक इंटरनेटचा वापर करीत नाहीत. त्यामुळे चॅनेलची निवड करावी तरी कशी, असा प्रश्‍न त्यांना पडला आहे. 
  

पूर्वी आम्हाला तीनशे रुपयांत सर्व चॅनेल दिसत होते. आता त्याच चॅनेल पॅकसाठी आम्हाला साडेचारशे रुपये मोजावे लागत आहेत. यात नको असलेल्या चॅनेलची संख्या आधिक आहे. त्यासाठी विनाकारण दीडशे रुपये भरावे लागत आहेत. 
- शोभा माने, ग्राहक. 
 
 
या नियमाला आमचा अगोदरपासून विरोध होता. यातून केबल चालकांच्या पदरात काहीही पडणार नाही. यातून फक्त ब्रॉडकास्ट कंपन्या व सरकारला फायदा होणार आहे. ग्राहकांना फटका बसत आहे. अनेक ग्राहक आमच्याकडे तक्रारी घेऊन येत आहेत. 
- योगेश मसलगे पाटील, सचिव, ए कॉफ, केबल ऑपरेटर वेलफेअर फेडरेशन, औरंगाबाद.  

Web Title: Watch TV now expensive