या शाळेत वाजते "वॉटर बेल'

अविनाश काळे
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

  • हा उपक्रम राबविणारे श्री श्री रविशंकर विद्यालय तालुक्‍यात पहिले 
  • पाणी पिण्यासाठी दिला जातो दोन मिनिटांचा ब्रेक 
  • शालेय तासिकांव्यतिरिक्त दिवसभरातून दोनदा वॉटर बेल 

उमरगा (जि. उस्मानाबाद) : केरळ राज्यातील शाळांच्या धर्तीवर उमरगा येथील श्री श्री रविशंकर विद्यालयात अनोखा "वॉटर बेल' 
उपक्रम राबविला जात आहे. पाणी पिण्यासाठी नियमित "वॉटर बेल' दिली जाते. विद्यार्थ्यांचाही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 
विद्यार्थ्यांनी नियमितपणे पाणी प्यावे या दृष्टिकोनातून शालेय तासिकांव्यतिरिक्त दिवसभरातून दोनदा वॉटर बेल दिली जाते. विद्यार्थ्यांना दोन मिनिटांची विश्रांती दिली जाते. यादरम्यान सर्व विद्यार्थी आपल्या दप्तरातील पाण्याची बाटली काढून पाणी पितात, असा उपक्रम राबवणारी उमरगा तालुक्‍यातील श्री श्री रविशंकर विद्यामंदिर ही पहिलीच शाळा आहे. याबाबत मुख्याध्यापक दिगंबर कुलकर्णी म्हणाले, बहुतांश विद्यार्थी नियमित पाणीच पीत नाहीत, ही समस्या आमच्या लक्षात आली आहे. शाळेमध्ये सातशे विद्यार्थी असून, सर्वच्या सर्व विद्यार्थी नियमितपणे पाण्याची बाटली आणतात व वॉटर बेलच्या वेळी पाणी पितात. 

हेही वाचा शेतकऱ्यांना तारण योजनेत चार कोटींचा फायदा

हेही वाचा ग्रामीण भागात गळक्या शाळा अन्‌ पडक्‍या भिंती, सांगा शिक्षण कसे घ्यावे?

निरोगी आरोग्यासाठी 
शिक्षक श्रीकांत मेंढे यांनी या उपक्रमाची माहिती व संकल्पना मांडली. सीबीएसई स्कूलचे प्राचार्य गणपत देवकर म्हणाले, की विद्यार्थ्यांनी भरपूर पाणी प्यावे म्हणून केरळमधील शाळेत दिवसातून तीनवेळेस वॉटर बेल वाजते. पाणी कमी पिल्याने डिहायड्रेशन, थकवा येणे, चिडचिड किंवा मूत्रमार्गात संसर्ग होण्याइतपत समस्या निर्माण होऊ शकतात. खरे तर दिवसातून दोन ते तीन लिटर पाणी प्यायला हवे. या उपक्रमासाठी मुख्याध्यापक हिरानाथ सगर, शिल्पा जगताप, सर्व शिक्षकांनी पुढाकार घेतला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Water Bell" project in school