आठ हजार कुटुंबांचे पाणी बंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

थकीत बिलासाठी कंत्राटदाराचा पुन्हा चक्का जाम

औरंगाबाद - बिल थकल्यामुळे गुरुवारी (ता. तीन) कंत्राटदाराने पुन्हा एकदा टॅंकर बंद केले. त्यामुळे शहरातील सुमारे आठ हजार कुटुंबांचे पाणी बंद झाले आहे. काही दिवसांपूर्वी 25 लाख रुपये दिल्यानंतर कंत्राटदाराने टॅंकर सुरू केले होते. मात्र, थकबाकी कोट्यवधींच्या घरात असल्याने कंत्राटदाराने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. 

शहरातील गुंठेवारी भागासह सातारा-देवळाईमध्ये महापालिका सध्या 95 टॅंकरद्वारे 550 फेऱ्या करून पाणीपुरवठा करते. त्यावर आठ हजार कुटुंब अवलंबून आहेत. हे नागरिक महापालिकेला वर्षभराचे ऍडव्हान्स पैसे भरतात. महापालिकेतर्फे मात्र टॅंकरच्या ठेकेदाराला वेळेवर बिले दिली जात नसल्यामुळे वारंवार टॅंकर बंद केले जात आहेत. थकीत रक्कम कोट्यवधींच्या घरात गेल्यामुळे कंत्राटदाराने गुरुवारपासून पुन्हा टॅंकर बंद करण्याचा इशारा दिला होता. याबाबत आयुक्त, महापौरांना निवेदने दिल्यानंतरही हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे गुरुवारी टॅंकर बंद करण्यात आले. 
 
पाण्याचे पैसे इतरत्र वळविले 
नागरिकांनी भरलेल्या पाणीपट्टीचे स्वतंत्र खाते उघडण्यात आले आहे. त्यात 67 लाख रुपये जमा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्यातील 25 लाख रुपये कंत्राटदाराला नुकतेच देण्यात आले. मात्र 25 लाख इतर कामासाठी देण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापौर नंदकुमार घोडेले यांनी तातडीने कंत्राटदाराला 50 लाख रुपये देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. 
 
निवडणुकीच्या तोंडावरच आंदोलन का? 
लोकसभा निवडणुकीत कचरा, पाण्याचा प्रश्‍न महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला चांगलाच भोवला होता. अनेक भागांत नागरिकांनी पदाधिकाऱ्यांना सवाल करत भंडावून सोडले होते. आता विधानसभा निवडणूक लागताच टॅंकर वारंवार बंद होत आहेत. त्यामुळे महापौरांनी थेट कंत्राटदाराला फोन करून निवडणुकीतच आंदोलन का सुरू होते? असा प्रश्‍न केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water closure eight thousand families