जिरडगावाची दुष्काळातून सुकाळाकडे वाटचाल 

सुभाष बिडे
Friday, 6 September 2019

सकाळ रिलीफ फंडातून नाला खोलीकरणामुळे जमले हक्‍काचे पाणी 

घनसावंगी (जि.जालना) - आंबा लागवडीसह फळबागांसाठी प्रसिद्ध असलेल्या जिरडगाव परिसराची वर्ष 2012 पासून पडणाऱ्या सततच्या दुष्काळाने जणू रयाच गेली. बागायतीऐवजी कोरडवाहू शेतीचा भाग अशी अवस्था झाली; पण आता दुष्काळातून पुन्हा सुकाळाकडे जिरडगावची वाटचाल सुरू होणार आहे. सकाळ रिलीफ फंडातून येथे नाला खोलीकरण झाले, परिणामी नुकत्याच पडलेल्या पावसात नाला तुडुंब भरला आहे. त्यामुळे परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. आता पुन्हा बागायतीचा मार्ग मोकळा होणार आहे. 

जिरडगावात तनिष्का स्त्रीप्रतिष्ठा अभियान गटाने सकाळ रिलीफ फंडातून नाला खोलीकरणासाठी पुढाकार घेतला. परिसराला गतवैभव मिळवून देण्यासाठी सिंचनाच्या दृष्टीने कार्य गरजेचे असल्याने तनिष्का गटाला ग्रामस्थांचीही भक्‍कम साथ मिळाली. एकेकाळी केशर आंब्याच्या लागवडीसाठी जिरडगाव प्रसिद्ध होते. मोसंबी, डाळिंब फळबागा लक्ष वेधून घेत होत्या; मात्र दुष्काळाने हे चित्रच बदलून टाकले होते. 

यंदाही दुष्काळाने परिसर होरपळलेला असल्याने पाणी अडविण्याचे महत्त्व ग्रामस्थांना पटलेले होते. त्यामुळे गावपरिसरातील काटेरी झाडाझुडपांसह गाळात हरवलेला नदीनाल्याचा परिसर मोकळा करण्याचा निर्धार झाला. यासाठी सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून येथे जवळपास सहा किलोमीटरपर्यंत नदी व नाल्याचे रुंदीकरण तसेच जवळपास 12 ते 16 फूट खोलीकरण करण्यात आले. प्रारंभी परिसरात पावसाने पाठ फिरविली होती; मात्र पोळ्यापासून पावसाने हजेरी लावण्यास सुरवात केल्याने येथे जवळपास तीस कोटी लिटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरातील विहिरी, कूपनलिकांच्या भूजलपातळीत मोठी भर पडण्यास सुरवात झाली आहे. 

तनिष्कासह ग्रामस्थांची एकजूट 
जिरडगाव येथे सकाळ रिलीफ फंडातून नाला खोलीकरणासाठी तनिष्का गटासह ग्रामस्थांनी एकजूट दाखविली. अनेकांनी या कामात सहभाग घेतला हे विशेष. यासाठी तनिष्का सदस्या कविता पाळिकराव, विद्या सुनील उगले, विजयमाला पाळिकराव, प्रभावती उगले, शंकुतला उगले, सुलोचना उगले, अपेक्षा उगले, मंगल गायकवाड, अयोध्या उगले, कालिंदा उगले, शोभा उगले, यशोदा उगले, सुनीता उगले, शिवाजीराव उगले, नामदेव पाळिकराव, देविदास उगले, छबूराव उगले, विष्णू अंबादास उगले, माऊली उगले, मनोहर शिंदे, ईश्‍वर उगले, विष्णू उगले, विलास उगले, वसंत उगले, अंकुशराव उढाण, भुजंगराव उगले, पुरुषोत्तम उगले आदींनी पुढाकार घेऊन या मोहीम यशस्वितेसाठी पुढाकार घेतला. पाणीसाठा निर्माण झाल्यानंतर सरपंच नामदेव पाईकराव, सुनील उगले यांच्यासह ग्रामस्थांनी पाणीसाठ्याची पाहणी केली. 
 

तनिष्का गटाच्या पुढाकाराने सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून नाला खोलीकरण व रुंदीकरणाचे काम झाले. पहिल्याच पावसात येथे पाणीसाठा झाला. आता पाणीप्रश्‍न मिटण्यास मदत होईल, त्याचबरोबर शेती सिंचनाखाली येण्याबरोबर पाणीपुरवठ्यांच्या विहिरीला मोठी मदत होणार आहे. 
- शिवाजी उगले
शिक्षक 

एकेकाळी केशरआंबा, मोसंबीचा फळबागांत जिरडगाव अग्रेसर होते; मात्र सततच्या दुष्काळाने ही ओळख मिटली. आता सकाळ रिलीफ फंडातून झालेल्या खोलीकरणाच्या कामामुळे पावसाच्या हजेरीबरोबरच चांगला पाणीसाठा निर्माण झाला आहे. परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरींचा पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे. 
- छबूराव उगले
शेतकरी 

सकाळ रिलीफ फंडाच्या कामामुळे अनेक वर्षांपासून अरुंद झालेल्या नाल्याचे रुंदीकरण झाले, पावसाच्या आगमनानंतर आता गावशिवारात पाणी अडले आहे. पाणी जिरत असल्याने दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 
-विलासराव उगले
शेतकरी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water conservation work in Jiradgaon