उद्योगांवर जलसंकट!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

गेल्या सहा दिवसांपासून पाणीबाणीला सामोरे जाणाऱ्या शेंद्रा, चिकलठाणा आणि वाळूज औद्योगिक वसाहतींमधील कंपन्यांना पाण्याची जमवाजमव करणे जड जात आहे. 

औरंगाबाद - सुविधांच्या नावाने आधीच बोंब असलेल्या चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत आता पाणीसंकटाची भर पडली आहे. गेल्या सहा दिवसांपासून पाणीबाणीला सामोरे जाणाऱ्या शेंद्रा, चिकलठाणा आणि वाळूज औद्योगिक वसाहतींमधील कंपन्यांना पाण्याची जमवाजमव करणे जड जात आहे. 

गेल्या पाच दिवसांपासून पाण्याच्या प्रश्नाने होरपळून निघणाऱ्या चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत सोमवारी (ता. १५) देखील पाण्याची बोंब झाली. ७२ एमएलडी पाणी उपसा करणाऱ्या एमआयडीसीतर्फे चार एमएलडी पाणी हे गळतीत जाते हे मान्य करण्यात येते. त्यावर ११ एमएलडी पाणी हे टॅंकरद्वारे पिण्यासाठी देण्यात येत असल्याचेही एमआयडीसीचे अधिकारी मान्य करतात. मग, उपसा बंद झालेला नसताना उरलेल्या ५७ एमएलडी पाण्याचे नेमके काय होते, याची माहिती देण्यासाठी एमआयडीसी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप उद्योग जगतातून होत आहे. पाण्यावर उत्पादनासाठी निर्भर असलेल्या चिकलठाण्यातील कंपन्यांना टाळे लागण्याची चिन्हे आहेत. पाणी कपात केवळ वीस टक्के असताना नळांचे पाणी आठवडाभर गायब होण्यामागे कोणाचे ‘हित’ आहे, असा सवाल आता उभा राहिला आहे. 

आता चार तासच मिळणार पाणी
वाळूज आणि चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत पाणी देण्यासाठी एमआयडीसीने नवे वेळापत्रक तयार केल आहे. यानुसार वाळूजला दुपारी एक ते सायंकाळी सातदरम्यान कधीही चार तास पाणी देऊ असे सांगण्यात आले आहे. चिकलठाणासाठी सकाळी दहा ते रात्री दोन या वेळेत कधीही चार तास पुरवठा केला जाणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता भूषण हर्षे यांनी दिली. उन्हाळ्याचे उर्वरित दीड महिनेही पूर्ण क्षमतेने उपसा करून आवश्‍यक त्या उपाययोजनांसह पाणी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जारवाल्यांची चंगळ, टॅंकरसाठी मारामार 
पिण्यासाठी पाणी शिल्लक नसल्याने पाण्याचे जार विकत घेतले जात आहेत. या टंचाईने जारवाल्यांची चंगळ होत असून २० रुपयांना मिळणारे २० लिटर पाण्याचे जार आता ५० रुपयांना विकले जात असल्याची माहिती उद्योजक मनीष अग्रवाल यांनी दिली. टॅंकर मिळण्यासाठी नंबर लावल्यास ८८० रुपये किमतीचे टॅंकर दोन दिवस वाट पाहून मिळत असल्याने लघुउद्योजकांवर आपले कारखाने बंद करण्याची वेळ येऊन ठेपल्याचे त्यांनी पुढे सांगितले. 

अडीच तासांत ३७० लिटर पाणी 
मोठ्या मिन्नतवाऱ्या करून रविवारी रात्री काही तासांसाठी चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत पाणी आले. अडीच तासांसाठी झालेल्या या पुरवठ्याचा दाब एवढा कमी होता की, पुरवठा संपल्यावर मोजदाद केली, तेव्हा केवळ ३७० लिटर पाणी आल्याचे दिसले. असेच सुरू राहिले तर कंपन्यांनी पाणी कुठून आणायचे आणि कारखाने कसे चालवायचे, असा सवाल मासिआचे प्रमुख किशोर राठी यांनी उपस्थित केला आहे. असेच सुरू राहिले तर आंदोलनाचे शस्त्र उचलावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. 

Web Title: Water crisis Chikalthana industries