गुरुवारी पुन्हा शटडाउन; दोन दिवस पाणीसंकट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

औरंगाबाद - उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा बसू नयेत यासाठी महापालिका प्रशासनाने गेल्या आठवड्यातच 24 तासांचे शटडाउन घेऊन दोन्ही जलवाहिनीच्या दुरुस्त्या केल्या; मात्र 24 तास पूर्ण होत नाहीत, तोच रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाजवळ 1400 मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला मोठी गळती लागली. तात्पुरती मलमपट्टी करून सध्या शहराची तहान भागविण्यात येत आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी गुरुवारी (ता. 16) पुन्हा सकाळी 10 ते 12 या वेळेत शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे आणखी दोन दिवस शहराला पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत.

जायकवाडी धरणात मुबलक पाणी असूनही वितरण व्यवस्थेतील नियोजनाअभावी शहरात तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. उन्हाळ्यात त्यात अडचणी येऊ नयेत म्हणून सोमवारी (ता. सहा) 24 तासांचा शटडाउन घेण्यात आला होता. या काळात जायकवाडीपासून रेल्वेस्टेशनपर्यंत 5 मोठ्या तर 30 छोट्या दुरुस्त्या करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले; मात्र गुरुवारी (ता. आठ) रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाजवळ 1400 मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला मोठी गळती लागली. ही दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा शटडाउन घ्यावा लागणार असल्याचे लक्षात आल्याने तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली असून, अद्यापही गळतीतून लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांनी सांगितले, की आता गुरुवारी (ता. 16) सकाळी 10 ते 12 या वेळात दोन तासांचा शटडाउन घेण्यात येणार आहे. जलवाहिनी रिकामी होण्यासाठी किमान 6 तास लातात, त्यानंतर दुरुस्ती केली जाईल.

दोन दिवस निर्जळी
जुन्या शहराला पाणीपुरवठा करणारी 700 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी सुरू राहणार आहे. शहागंज, ज्युबिलीपार्क, विद्यापीठ, दिल्लीगेट आदी ठिकाणी असलेल्या जलकुंभांवर जायकवाडीचे पाणी येणार आहे. या भागात शटडाऊनचा फारसा फरक पडणार नाही. याशिवाय हर्सूल तलावातून येणाऱ्या पाण्यावर जुन्या शहरातील आठ वॉर्डांची तहान भागत आहे. असे असले तरी गुरुवारी (ता. 16) इतर ठिकाणी वसाहतींना पाणीपुरवठा होणार आहे, तिथे पाणीपुरवठा होण्याची शक्‍यता कमी आहे. शुक्रवारीही शहरासह सिडकोतही कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्‍यता आहे.

उन्हाळापूर्व नियोजन करा
महापौर भगवान घडामोडे यांनी कार्यकारी अभियंता श्री. चहल यांना उन्हाळापूर्व नियोजन करण्याची सूचना केली. उपलब्ध पाणी वाचवून अंतर्गत पाणीपुरवठा व्यवस्थेचे नियोजन करावे. काही भागांना आठ-नऊ तास पाणी मिळते, तर काही भागांना तास-दोन तास. अनेक भागांत 40 ते 45 मिनिटे पाणी येते. यासाठी नियोजन करून सर्वच भागांत समान पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश दिले.

Web Title: water disaster in aurangabad