उद्योगांवर जलसंकट

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 12 जुलै 2019

लांबवर टाकले दोन पंप
जॅकवेलमध्ये असलेले पाणी पुरेसे नसल्याने त्यामध्ये पाणी आणण्यासाठी धरणाच्या मध्ये जिथे पाणी आहे तिथून आणण्यासाठी दोन पंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. या पंपांच्या माध्यमातून धरणातील पाणी हे जॅकवेलपर्यंत आणले जात आहे. जॅकवेलमधील पाणी उपसून ते उद्योगांपर्यंत पोचविण्यात येत आहे. शिवाय पंपांमध्ये गाळ आणि गवत अडकत असल्याने पाण्याच्या उपशात मोठे अडथळे निर्माण होत आहेत. यातील पाणी हे पिण्यासाठी काही गावांना टॅंकरद्वारेही द्यावे लागत असल्याने कारखान्यांपर्यंत पोचणाऱ्या पाण्याचे प्रमाण घटले आहे.

औरंगाबाद - साडेचार हजार उद्योगांचे शहर म्हणून ख्याती असलेल्या औरंगाबादेतील औद्योगिक वसाहतींवरील जलसंकट आता अधिक गडद होत चालले आहे. जायकवाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटल्याने पूर्ण क्षमतेने उपसा करण्यात अडथळे उभे राहत आहेत. उद्योगांकरिता एमआयडीसीची ७२ एमएलडी क्षमता असलेल्या वाहिनीतून सध्या ४५ ते ५० एमएलडी पाणीच उद्योगांसाठी उपसले जात आहे.

ऑटोमोबाईल, फार्मा, ब्रेव्हरीज, रसायने आणि स्टील उद्योगांसाठी परिचित असलेल्या औरंगाबादेतील औद्योगिक क्षेत्रांना मात्र आता जलसंकट सतावयाला लागले आहे. जायकवाडी धरणातील पाणीपातळी घटल्याने औरंगाबादसह या धरणावर आधारित मराठवाड्यातील लोकांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. गेल्या आठवड्यापासून वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा आणि जालन्यातील औद्योगिक वसाहतींना पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याचे समोर आले आहे. औद्योगिक वसाहतीला पुरवठा करणाऱ्या ब्रह्मगव्हाण येथील पंपिंग स्टेशनच्या जॅकवेलची पाणीपातळी खोल गेल्याने उपसा घटला आहे. या जॅकवेलमध्ये येणारे पाणी तीनही पंप लावल्यानंतरही पुरेशा प्रमाणात उपसता येत नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे.

औरंगाबाद आणि जालन्यातील उद्योगांना पाणी पुरवणाऱ्या योजनेलगतचे जायकवाडी धरणातील पाणी कमी झाले आहे. उपसा कमी झाल्याने अडचणी येत आहेत. जिथे पाणी आहे तेथून पाणी आणण्यासाठी दोन पंप कार्यान्वित केले आहेत. त्यांच्या आधारे पाणी जॅकवेलमध्ये आणून ते उद्योगांपर्यंत पोचविण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 
- भूषण हर्षे, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Disaster on Business Water Shortage