शहरावर पुन्हा जलसंकट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाखाली जलवाहिनी फुटली; पाणीपुरवठा विस्कळित

रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाखाली जलवाहिनी फुटली; पाणीपुरवठा विस्कळित
औरंगाबाद - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 1400 व 700 मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीचा रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाखाली असलेला जोड रविवारी (ता. नऊ) रात्री साडेबाराच्या सुमारास फुटला. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. त्यामुळे पुढील किमान तीन-चार दिवस शहरवासीयांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागण्याची शक्‍यता आहे.

महापालिकेने 24 तासांचा शटडाऊन घेतल्यापासून जलवाहिनी फुटण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. पहिल्या शटडाऊनमध्ये 35 गळत्या दुरुस्त केल्याचा दावा केल्यानंतर लगेच दुसऱ्या चोवीस तासांत रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाजवळ मोठी गळती लागली. ही गळती बंद करताच चितेगावजवळ जलवाहिनी फोडण्याचे प्रकार सुरू झाले. त्यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न झाले न झाले तोच रविवारी मध्यरात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाखाली 700 आणि 1400 मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिन्यांचा जोड आहे त्या ठिकाणीच जलवाहिनी फुटली आणि मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले. याची माहिती मिळताच शाखा अभियंता किरण धांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाणीपुरवठा बंद केला व घटनास्थळी जाऊन पाहणी केली. जलवाहिनी फुटल्याच्या ठिकाणी मोठे खड्डे पडलेले होते. त्यातील संपूर्ण पाणी बाहेर काढून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत काम सुरू होते. काम पूर्ण होण्यास 24 तास लागणार असल्याचे सांगण्यात आले. 24 तासानंतर जरी पाणीपुरवठा सुरू झाला तरी पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी किमान तीन-चार दिवस लागतील, असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केले.

वारंवार का होतेय गळती?
दोन्ही जलवाहिन्यांचा जोड अतिशय जुनाट झाला आहे. त्यामुळे पाण्याचे थोडे जरी प्रेशर वाढले; तरी जलवाहिनीचा पत्रा फाटतो. त्या जागी वेल्डिंग करणे शक्‍य नसल्याने पत्र्याच्या रिंग बसवण्यात आल्या आहेत. परिणामी, वारंवार जलवाहिनी फुटण्याच्या घटना घडत आहेत.

कोणत्या भागात कधी येणार नळ?
जलवाहिनी फुटल्यामुळे पाणीपुरवठ्याचे नियोजित वेळापत्रक एक दिवस पुढे ढकलण्यात आले आहे. ज्या भागात पाणी आले नाही त्या भागात दुसऱ्या दिवशी पाणीपुरवठा होईल. सोमवारी (ता.10) ज्युबलीपार्क, हनुमान टेकडी, विद्यापीठ, शहागंज, जिन्सी, क्रांती चौक, विश्‍वभारती कॉलनी, ज्योतीनगर, गारखेडा या पाण्याच्या टाक्‍यांतून व इतर गुरुत्ववाहिनीवरील पाणीपुरवठा होऊ शकला नाही. या भाग टाक्‍यांमधून मंगळवारी (ता.11) पाणीपुरवठा केला जाणार आहे. तसेच काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होऊ शकतो, असे पाणीपुरवठा विभागाने कळवले आहे.

Web Title: water disaster in city