समान वाटपावर ‘पाणी’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जून 2019

दोन पंप जळाले
दोन दिवसांपूर्वी जायकवाडी येथील वीजपुरवठा खंडित झाला होता. यावेळी दोन पंप जळाल्याचा प्रकार घडला. इतर दोन पंपही पॅनेलमध्येही बिघाड झाल्याने बंद पडले आहेत. त्यामुळे पाण्याचा दाब कमी होत आहे. परिणामी, शहराला मिळणारे पाणीही कमी झाले आहे.

औरंगाबाद - शहरात तीन दिवसांआड समान पाणी देण्याचे पदाधिकारी, प्रशासनाचे आश्‍वासन हवेत विरले आहे. सिडको-हडकोत काही भागांत चार दिवसांआड तर काही भागांत सहा दिवसांआड पाणी येत होते. आता त्यात आणखी एक दिवसाचा गॅप देण्यात आल्यामुळे नागरिक संतप्त आहेत.

शहरातील पाण्याचे वेळापत्रक गेल्या चार महिन्यांपासून कोलमडले आहे. जायकवाडी धरणातील उपयुक्त पाणी साठा संपल्यापासून नागरिकांचे पाणी... पाणी.. सुरू आहे. महापालिकेने आपत्कालीन पंप लावून पाणी उपसा सुरू केला असला तरी तब्बल २० ते ३० एमएलडीने शहरात येणारे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे सिडको-हडको भागात तब्बल सहा ते आठ दिवसांनंतर पाणी दिले जात आहे. समान पाणी देण्यासाठी नगरसेवक नागरिकांनी वारंवार आंदोलने केली.

त्यावेळी महापौर नंदकुमार घोडेले व आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी तीन दिवसांआड पाणी दिले जाईल, अशी घोषणा केली; मात्र अद्याप नियोजन झालेले नाही. त्यात एक दिवस विलंबाने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 

तसेच शहरातील काही भाग वगळता इतर भागांत एक दिवस विलंबाने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गुरुवारी ज्योतीनगर, एन सात, उल्कानगरी, एन-१२, एन-११, यासह इतर भागात पाणीपुरवठा करण्यात येणार होता; मात्र एक दिवसाचा गॅप वाढल्याने या भागात शुक्रवारी पाणी मिळणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Distribution Administrative