पाणी अत्यावश्‍यक सेवा, शहर वेठीस धरता येणार नाही 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - महापालिका महावितरणला पाणीपुरवठ्यासाठीचे वीजबिल नियमित भरत आहे. केवळ चालू महिन्याचे बिल थकले म्हणून पाणीपुरवठ्याची वीज खंडित करता येणार नाही. पाणी अत्यावश्‍यक सेवा असल्याने महावितरण 15 लाख नागरिकांना वेठीस धरणार नाही, असे मत महापालिका आयुक्‍त ओमप्रकाश बकोरिया यांनी व्यक्‍त केले. 

औरंगाबाद - महापालिका महावितरणला पाणीपुरवठ्यासाठीचे वीजबिल नियमित भरत आहे. केवळ चालू महिन्याचे बिल थकले म्हणून पाणीपुरवठ्याची वीज खंडित करता येणार नाही. पाणी अत्यावश्‍यक सेवा असल्याने महावितरण 15 लाख नागरिकांना वेठीस धरणार नाही, असे मत महापालिका आयुक्‍त ओमप्रकाश बकोरिया यांनी व्यक्‍त केले. 

महावितरणने पाणीपुरवठ्याचे नऊ कोटी रुपयांचे वीजबिल भरण्यासंदर्भात नोटीस बजावल्याच्या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते. पथदिव्यांच्या थकबाकीपोटी महावितरणने गेल्या शुक्रवारी (ता. तीन) वीजपुरवठा खंडित केला होता. त्यामुळे शहरातील रस्ते चार दिवस अंधारात होते. महापालिकेने 50 लाख रुपयांचा धनादेश दिल्यानंतर मंगळवारी (ता. सात) पथदिवे सुरू झाले. दरम्यान, पथदिव्यांच्या बिलाची जुळवाजुळव करण्याच्या कामात महापालिका असताना महावितरणने आता जायकवाडी येथील पाणीपुरवठ्यासाठी लागणाऱ्या थकबाकीसंदर्भात नोटीस बजावली आहे. 

ग्रामीण मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांनी मंगळवारी (ता. सात) दिलेल्या नोटिसीत म्हटले, की महापालिकेच्या जायकवाडी येथील पंपिंग स्टेशनला पाच वीज जोडण्या आहेत. व्याज व दंडासह एकूण नऊ कोटी 72 लाख 419 रुपयांची थकबाकी निघते. ही रक्कम तत्काळ भरावी अन्यथा पाचही जोडण्यांचा वीजपुरवठा बंद करण्यात येईल, असा इशारा या नोटीसमध्ये देण्यात आला आहे. नागरिकांना यामुळे होणाऱ्या गैरसोयीसाठी महावितरण जबाबदार राहणार नसल्याचेही नोटिसीत स्पष्ट करण्यात आले आहे. 

वीजबिल भरण्यासाठी महावितरणने बुधवारची (ता. आठ) मुदत दिली होती. महापालिका प्रशासनाने सायंकाळपर्यंत यापैकी काहीही भरणा केला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. 

नियमित होतो वीजबिल भरणा : आयुक्‍त 
महापालिका आयुक्‍त ओमप्रकाश बकोरिया यांनी यासंदर्भात सांगितले, की महापालिका पाणीपुरवठ्याचे नियमितपणे वीजबिल भरत आहे. कदाचित जानेवारीचे बिल राहिले असेल. नियमित बिल भरणा करत असताना चालू महिन्याच्या बिलावरून महावितरण पाणीपुरवठा योजनेची वीज तोडून 15 लाख शहरवासीयांना वेठीस धरू शकत नाही. पाणी ही अत्यावश्‍यक गरज असल्याने महावितरण वीज तोडू शकत नसल्याचे मत त्यांनी व्यक्‍त केले. 

Web Title: water Essential service