जायकवाडीत येणाऱ्या पाण्याची आवक घटली

चंद्रकांत तारु
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

जायकवाडी धरणाच्या पातळीत पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे मंगळवारी (ता.13) रात्री दहापर्यंत धरणाच्या पाणीसाठ्यात फक्त एक टक्का वाढ झाली आहे. या वाढीमुळे धरणाचा एकूण पाणीसाठा 91 टक्के झाला आहे.

पैठण  (जि.औरंगाबाद) : जायकवाडी धरणाच्या पातळीत पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे मंगळवारी (ता.13) रात्री दहापर्यंत धरणाच्या पाणीसाठ्यात फक्त एक टक्का वाढ झाली आहे. या वाढीमुळे धरणाचा एकूण पाणीसाठा 91 टक्के झाला आहे.

नाशिक जिल्ह्यातील पाऊस थांबला असून, त्यामुळे पाणलोटक्षेत्रात पाणी येण्याची आवक कमी झाली असल्याची माहिती धरण नियंत्रण कक्षातून देण्यात आली. सकाळी सात वाजता तेरा हजार क्‍युसेक पाण्याची आवक सुरू होती. यानंतर दिवसभरात एकदाही त्यात वाढ झाली नाही. बारा हजार क्‍युसेकने आवक राहिली. पाणीपातळीत मोठी वाढ झाली असती, तर धरण प्रशासनाला धरणाचे दरवाजे उघडण्याच्या हालचाली कराव्या लागल्या असत्या, अशी चर्चा होती.

दरम्यान, धरणाची पाणीपातळी 1520.34 फूट, 463.400 मीटर आहे. पाणी आवक 14635 क्‍युसेक, एकूण पाणीसाठा 2714.284 दशलक्ष घनमीटर, जिवंत पाणीसाठा 1976.778 दशलक्ष घनमीटर आहे. धरणाच्या डाव्या कालव्यातून सातशे, उजव्या कालव्यातून नऊशे क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या दोन्ही कालव्यांत शंभर क्‍युसेक वाढ करण्यात आली आहे. गोदापात्रातील हिरडपुरी, आपेगाव या बंधाऱ्यातही जल विद्युतनिर्मिती केंद्रातून पाणी सुरू आहे. पाण्याची आवक कमी झाली असली तरी धरण व तालुका प्रशासन सतर्क आहे, असे आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार महेश सावंत यांनी सांगितले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water flow decreases In Jayakwadi