दुथडी वाहतेय गोदावरी नदी 

दिलीप पवार
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

अंकुशनगर (जि. जालना) : फळबाग, उसासह रब्बी पिकांना होणार फायदा 

अंकुशनगर (जि. जालना) - गेल्या तीन वर्षांपासून कोरडीठाक असलेली गोदावरी नदी यंदा अतिवृष्टीमुळे दुथडी भरून वाहत आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यांत चारवेळेस वाहिली आहे. अर्थात ही नाशिकच्या गोदावरीची कृपा म्हणावी लागेल. 

सध्या अंबड व घनसावंगी तालुक्‍यातील पाणी समस्या दूर करण्यासाठी गोदावरी नदी वरदान मानली जाते. यंदा नाशिक, नगर जिल्ह्यांत जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणातून वेळोवेळी पाणी सोडले गेले. परिणामी गोदावरी नदी दुथडी वाहत आहे. धरण पूर्णपणे भरलेले आहे. त्यामुळे साहजिकच आवश्‍यकतेप्रमाणे डाव्या कालव्याला पाणी राहणार आहे. या दोन्ही पाणी स्रोतांचा फायदा शेतकरीवर्गाला मोठ्या प्रमाणात होणार आहे. 

तीन वर्षांनंतर गोदावरी नदीकाठावरील व डाव्या कालव्याजवळील वडीगोद्री, अंतरवाली सराटी, नालेवाडी, दह्याळा, भांबेरी, बळेगाव, आपेगाव, साष्ट पिंपळगाव, गोरी, शहागड, कुरण, पाथरवाला, गोंदी, हसनापूर, तीर्थपुरी त्याचबरोबर गोदावरी काठावरील हजारो एकर शेती पाण्याखाली येणार आहे. यामुळे नदीकाठासह कालव्याच्या परिसरात शेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. यामुळे शेतकरी समृद्ध होईल. फळबागांना फायदा होईल. भविष्यात पाणीटंचाईमुक्त होण्यास मदत होईल. यंदा गोदावरीवरील शहागड बंधारा, पाथरवाला बंधारा व त्याचबरोबर खालचे सर्व बंधारे भरले आहेत. वडीगोद्रीजवळील डाव्या कालव्याला पाणी राहणार असून परिसरातील शेतकऱ्यांना भविष्यात आता मोठा फायदा होणार असून रब्बी पिके व फळबाग, ऊस यांना मुबलक पाणी मिळून उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water in Godavari river at Jalna district