जायकवाडी काठोकाठ, शहरात ठणठणाट

Jayakwadi Dam Water
Jayakwadi Dam Water

औरंगाबाद - शहराला पाणीपुरवठा करणारे जायकवाडी धरण काठोकाठ भरलेले असताना महापालिकेच्या कुचकामी नियोजनामुळे नागरिकांच्या घशाला कोरड पडली आहे. समांतर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून ‘चोवीस तास सात दिवस पाणी देण्याच्या’ वल्गना सत्ताधारी व प्रशासनाने केल्या; मात्र केवळ दीड वर्षात या योजनेला मूठमाती देण्यात आली. सध्या आयुष्य संपलेल्या जुन्याच पाणीपुरवठा योजनेवर महापालिकेची भिस्त आहे. हे पाणी अपुरे पडत असल्याने आडात आहे; मात्र पोहराच (पाणीपुरवठा योजना) गळका असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

शहराला सध्या सातशे आणि १२०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यातील सातशेची पाइपलाइन ४० वर्षे जुनी, तर १२०० ची पाइपलाइन २५ वर्षे जुनी आहे. या दोन्ही योजना सलाईवर आहेत. डागडुजीवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करून महापालिका शहराला पाणीपुरवठा करीत आहे. या योजनांचे पाईप झिजले असल्याने वारंवार गळत्या लागतात. जायकवाडी धरण ते नक्षत्रवाडीपर्यंतच्या पाइपलाइनची अक्षरक्षः चाळणी झाली आहे. त्यामुळे ‘समांतर’चे काम हाती घेण्यात आले. या योजनेच्या माध्यमातून २४ तास सात दिवस पाणी देण्याची महापालिकेने केलेली घोषणा ‘समांतर’च्या कंपनीसोबत हवेत विरली.

गतवर्षी समाधानकारक पाऊस झालेला असल्याने आजघडीला नाथसागरात ४६ टक्के पाणी आहे; मात्र हे पाणी शहरापर्यंत आणण्यासाठी महापालिकेकडे यंत्रणाच नसल्याने नागरिकांचा आक्रोश सुरू झाला आहे. गेल्या आठ ते दहा वर्षांत समांतरचे काम पूर्ण करू न शकलेली महापालिका सध्या ‘पाणी देता का पाणी...’ म्हणत डीएमआयसी, एमआयडीसीकडे याचना करीत आहे.

नाथसागरात महापालिकेचे ११३ दशलक्ष घनमीटर एवढे पाण्याचे आरक्षण आहे; मात्र वर्षाला केवळ ५८ दशलक्ष घनमीटर एवढेच पाणी उचलले जाते. नवी पाइपलाइनच शहरवासीयांसाठी तारणहार ठरू शकते. 

वितरण व्यवस्थेत दोष
शहराचा विस्तार होत असताना पाण्याची मागणीदेखील वाढत आहे. सध्या केवळ १३५ एमएलडी पाणी शहरात येते. तर मागणी २२५ एमएलडीची आहे. वर्षानुवर्षे तेवढेच पाणी येत असताना नव्याने विकसित झालेल्या भागांना वशिलेबाजी करीत प्रशासनाने कनेक्‍शन दिले आहेत. त्यामुळे सिडको-हडको भागात तब्बल चार एमएलडी पाण्याची तूट येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com