परळीत पाणीप्रश्‍न पेटला, मंत्र्यांनी वाटले पाणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 जुलै 2019

आरोपापेक्षा पालिकेला सहकार्य करा - हालगे
पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या भूमिकेनंतर नगराध्यक्षा सरोजनी हालगे यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, पाच महिन्यांपासून परळी शहर तीव्र पाणीटंचाईचा सामना करत आहे. शहराला पाणीपुरवठा करणारा नागापूर येथील वाण प्रकल्प कोरडा पडला आहे. या भीषण परिस्थितीत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी पालिकेमार्फत शहरातील नागरिकांना २४ तास टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला गेला आहे. भरउन्हाळ्यात पाणीटंचाईने परळीकर हैराण असताना पालकमंत्री कुठे होत्या? पाणीवाटपाबाबत आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा पाणीटंचाईच्या परिस्थितीत परळी पालिकेला पालकमंत्र्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्रीमती हालगे यांनी केले आहे.

परळी वैजनाथ - पाच महिन्यांपासून शहराच्या इतिहासात प्रथमच तीव्र पाणीटंचाईने हैराण असलेल्या परळीत पावसाळा सुरू होऊन महिना झाल्यानंतरही पाणीप्रश्न पेटला असून, नगरपालिकेकडून पाणीवाटपात होत असलेला भेदभाव खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतः टॅंकरचे पाणी नागरिकांना वाटले. दरम्यान, मुंडेंनी दम दिल्यानंतर ‘पाच महिन्यांच्या तीव्र पाणीटंचाईच्या काळात ग्रामविकासमंत्री कुठे होत्या?’ असा सवाल नगराध्यक्षा सरोजनी हालगे यांनी केला आहे.

ग्रामविकासमंत्री मुंडे दोन दिवसांपासून परळीत असून, त्यांनी शुक्रवारी (ता. पाच) दीड-पावणेदोन वर्षांपासून रखडलेल्या परळी-पिंपळा-अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची पाहणी केली. नागरिकांच्या गैरसोयीबद्दल खंत व्यक्त करून आता या कामाला गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. शनिवारी (ता. सहा) शहरातील पद्मावती गल्ली भागात जाऊन नगरपालिकेचे पाणीवाटपाचे टॅंकर बोलावून स्वतः नागरिकांना पाणीवाटप केले. पालिकेने पाणीवाटपात केलेला भेदभाव व राजकारण खपवून घेतला जाणार नाही, असा दमही त्यांनी दिला. पालकमंत्री या नात्याने शासकीय स्तरावर परळी शहरातील नागरिकांना पाणीवाटप करण्यासाठी टॅंकर आपणच मंजूर केले असल्याचेही त्या म्हणाल्या. पाणीटंचाईबाबत नागरिकांनी मुंडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन तक्रारी केल्यानंतर पद्मावती भागात जाऊन मुंडेंनी टॅंकर बोलावून घेतले. या प्रकारामुळे राजकीय गोटात चर्चा होत आहे. 

पाणीवाटपावरून राजकीय चर्चा
पद्मावती गल्ली भागात पंकजा मुंडे यांनी शनिवारी टॅंकरचे पाणी नागरिकांना वाटले. या भागात चार महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विजय भोयटे व त्यांचे सहकारी टॅंकरचे पाणी नागरिकांना देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. घरोघरी जाऊन दोनशे ते चारशे लिटर पाणी वाटप करीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर या वॉर्डात पाणीवाटपाच्या राजकारणाची चांगलीच चर्चा रंगली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Issue Pankaja Munde Water Distribution