पाणीप्रश्‍नी भडका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

पाण्याचे ऑडिट करा
महापौर म्हणाले, सध्या शहरात बेकायदा नळ कनेक्‍शनवाले मजेत आणि अधिकृतवाले त्रस्त आहेत. सव्वा लाख बेकायदा कनेक्‍शन आहेत. त्यावर कारवाईचे आदेश देऊनही कारवाई होत नाही. शहराची रोजची गरज २५० एमएलडीची आहे. सध्या रोज १३८ एमएलडी पाणी येते. या हिशेबाने संपूर्ण शहराला एक दिवसाआड पाणी मिळाले पाहिजे.

औरंगाबाद - उन्हाळा सुरू होताच शहरातील पाणीप्रश्‍नाचा भडका उडाला असून, सोमवारी (ता. नऊ) नगरसेवकांनी पाण्याच्या टाकीवर आंदोलन केल्यानंतर महापौरांनी महापालिकेत तातडीची बैठक घेतली. त्यात शिवसेना-भाजप नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली, तर प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांनी पाणी कुणाची खासगी मालमत्ता नाही, असा दम भरला. 

महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात महापौरांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठक घेण्यात आली. या वेळी सिडको भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी टाकण्यात आलेल्या एक्‍स्प्रेस जलवाहिनीला जागोजागी पंक्‍चर करण्यात आल्याने सिडको एन-पाचच्या टाकीत पाणीच येत नसल्याचा आरोप सिडकोतील नगरसेवकांनी केला. त्यावर आयुक्‍तांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की एक्‍स्प्रेस लाइनला शिवाजीनगर, सूतगिरणी चौक, पुंडलिकनगर आदी ठिकाणी पंक्‍चर करण्यात आले आहे. त्यामुळे सिडकोतील आवक घटली आहे. पूर्वी सिडकोत ५८ एमएलडी पाणी येत होते; परंतु आता केवळ चार एमएलडी पाणीच येत आहे. त्यावर सिडकोतील नगरसेवक आक्रमक झाले. 

तुम्ही योग्य नियोजन करा आणि सिडकोला हक्काचे पाणी द्या, अशी मागणी मकरंद कुलकर्णी यांनी केली. त्याचवेळी गजानन मनगटे यांनी सिडको एन-चार भागासाठी पुंडलिकनगर येथील टाकीवरून गरज नसताना पाइपलाइन टाकत आहेत, असा उल्लेख केला. त्यावर भाजपचे राठोड, माधुरी अदवंत यांनी तीव्र आक्षेप घेतला. गरज नाही, असे तुम्ही कसे म्हणता? प्रशासनाचे काम त्यांना करू द्या, अशी सूचना केली. श्री. जंजाळ यांनी ज्या भागासाठी पाण्याची टाकी बांधली आहे, आधी त्याला पाणी दिले पाहिजे, असे मत मांडले. त्यावर माजी महापौर भगवान घडामोडे यांनी आक्षेप घेतला. याच मुद्यावरून शिवसेना-भाजपचे नगरसेवक एकमेकांसमोर उभे राहिले. जोरदार शाब्दिक चकमक झाली. महापौरांनी त्यांना शांत केले. आयुक्‍त राम यांनी पाणी ही खासगी संपत्ती असल्यासारखे वागू नका, पाण्याची टाकी आपल्या वॉर्डात आहे म्हणून दुसऱ्या वॉर्डाला पाणी देण्यास विरोध करू नका, असे ठणकावले.

Web Title: water issuem shivsena BJP